जगप्रसिद्ध, कुख्यात ड्रग माफिया अल चापोच्या पत्नीला अटक; अमेरिकेत मोठा प्लान फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 04:13 PM2021-02-23T16:13:23+5:302021-02-23T16:24:23+5:30

Emma coronel arrested in America : एम्मा कोरोनेल ही 31 वर्षांची आहे. 2019 मध्ये अल चापोने चौकशीत मोठमोठे धक्कादायक खुलासे केले होते. लहान मुलींनी ड्रग देणे, त्यांच्यासोबत अश्लिल प्रकार, लैंगिक शोषण करणे आणि कार्टेलच्या माजी सदस्यांची हत्या करणे याची कबुली दिली होती.

मेक्सिकोचा कुख्यात ड्रग माफिया म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या अल चापो गूसमैनच्या पत्नीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. एम्मा कोरोनेल ला सोमवारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संशयातून डलेस विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे.

एम्मा कोरोनेल ही 31 वर्षांची आहे. अमेरिकेच्या न्यायिक विभागाने सांगितले की, एम्मावर अमेरिकेत बेकायदा पद्धतीने एक किलोपेक्षा जास्त हेरॉईन, पाच किलो कोकेन आणि एक हजार किले गांजा व 500 ग्रॅम मेथामफेटामाईनची तस्करीचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे तिचा पती आणि ड्रग तस्कर अल चापो हा तस्करी आणि पैशांची अफरातफरी प्रकरणात न्यूयॉर्कमध्ये आजीवन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

2019 मध्ये अल चापोने चौकशीत त्याने मोठमोठे धक्कादायक खुलासे केले होता. लहान मुलींनी ड्रग देणे, त्यांच्यासोबत अश्लिल प्रकार, लैंगिक शोषण करणे आणि कार्टेलच्या माजी सदस्यांची हत्या करणे याची कबुली दिली होती.

कोरोनेलकडे अमेरिका आणि मेक्सिको देशांचे नागरिकत्व आहे. मंगळवारी तिला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोरोनेलवर अंमली पदार्थांच्या तस्करीसह तिच्या पतीला म्हणजेच अल चापोला 2015 मध्ये तुरुंगातून पळविण्यासाठी मदत केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.

अल चापो ला सध्या मेक्सिकोच्या सर्वाधिक सुरक्षित असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. चापोच्या मुलाने तुरुंगाच्या बाजुलाच जमीन खरेदी केली होती. चापोला तुरुंगातून सोडविण्यासाठी त्याने सुरुंग खोदायला सुरुवात केली होती.

अल चापोला एक जीपीएस असलेले घड्याळ देण्यात आले होते. याद्वारे आल चापो कोणत्या भागात आहे याची माहिती त्यांना मिळत होती. त्यानुसार ते त्या दिशेने सुरुंग खोदत होते. हा प्रयत्न निष्फळ ठरला होता.

याशिवाय कोरोनेल तिच्या पतीला बाहेर काढण्यासाठी आणखी एक प्लॅन आखत होती. मात्र, जानेवारी 2017 मध्ये अल चापोला अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात आले आणि हा प्लॅन फसला. 2007 मध्ये अल चापो आणि एम्मा कोरोनेल यांनी लग्न केले होते.

अल चापो हा शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याच्या घराच्या आजुबाजुला अफीमची शेती होत होती, त्यामुळे त्याने लहानपणापासूनच तस्करीचे धडे घेतले.

त्याने मिगेल अँजेल फेलिक्स गालार्दोला त्याचा गॉडफादर बनविले. त्याच्याकडूनच सारे शिकत चापो हा 1980 मध्ये मेक्सिकोच्या सर्वात शक्तिवान अशा सिनालोआ ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुखिया बनला.

यानंतर अल चापोने अमेरिकेतही सर्वाधिक ड्रग पुरवठा करण्यास सुरुवात केली.