दाऊदचा खास मित्र, IAS बनण्याचं होतं स्वप्न; एका घटनेनं बनला अंडरवर्ल्ड डॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:31 AM2023-10-16T09:31:30+5:302023-10-16T09:37:04+5:30

एक आयएएस अधिकारी बनून जीवन जगायचं होतं, मोठा भाऊ भारतीय सैन्यदलात दाखल झाला तेव्हापासून त्याच्यावरही प्रभाव पडला. वडील शिक्षक होते. घरातील वातावरणात शिक्षणासाठी पोषक होते. उच्च शिक्षणासाठी त्याला उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून लखनौला पाठवण्यात आले.

तो कायद्याचे शिक्षण घेऊ लागला. परंतु लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. द्वेष आणि बदला यातून तो अंडरवर्ल्ड डॉन बनला. ही कहाणी आहे बबलू श्रीवास्तवची...अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बरेलीहून प्रयागराजसाठी रविवारी रवाना केले. त्याच्या सुरक्षेसाठी ५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी तैनात होते.

बबलू श्रीवास्तवचे खरे नाव ओमप्रकाश श्रीवास्तव होते. तो यूपीच्या गाझीपूर येथील रहिवाशी होता. सामान्य कुटुंबात जन्मलेला बबलू सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होता. त्याला आधी आयएएस अधिकारी बनायचे होते. परंतु मोठा भाऊ विकास श्रीवास्तव भारतीय सैन्यदलात कर्नल झाला, त्यानंतर त्यालाही वर्दी घालण्याची इच्छा झाली.

पुढील शिक्षणासाठी तो लखनौला गेला. तिथे लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. घटना १९८२ ची, कॉलेजमध्ये निवडणुकीचे वातावरण होते. बबलूचा मित्र नीरज जैन हा महामंत्रीपदासाठी निवडणुकीत उभा होता. बबलू त्याचा प्रचार करू लागला. एकेदिवशी विरोधी गटासोबत त्यांची भांडणे झाली. त्यात एका विद्यार्थ्याला चाकूने मारण्यात आले.

७०-८० च्या दशकात लखनौमध्ये गँगवॉरनं जोर धरला होता. त्यात अरुण शंकर शुक्ला ‘अण्णा’चा दबदबा होता. लॉ कॉलेजमध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेला विद्यार्थी अण्णाच्या जवळचा होता. या घटनेने नाराज अण्णाने खोट्या गुन्ह्यात अडकवून बबलूला जेलला पाठवले. काही दिवसांनी बबलू जेलमधून बाहेर आला. परंतु त्याला पुन्हा चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. बबलू पुन्हा जेलला गेला.

बबलू या घटनेने खूप नाराज होता. त्याच्या मनात अण्णाविरोधात बदल्याची भावना तयार झाली. कुठल्याही परिस्थितीत त्याचा वचपा काढायचा हे त्याने ठरवले. जेलमधून बाहेर येताच बबलूने सर्वात आधी अण्णाच्या विरोधी गँगचा प्रमुख रामगोपाल मिश्राची भेट घेतली आणि त्याच्यासोबत काम करू लागला. त्याकाळी अण्णा आणि रामगोपाळ यांच्यात रक्तरंजित खेळ सुरू होता. परंतु अण्णाच्या आईच्या पुढाकाराने हा वाद शमला होता.

अरुण शंकर शुक्ला अण्णा आणि रामगोपाळ यांच्यातील तडजोडीची स्थिती पाहून बबलू श्रीवास्तव गँगमधून बाहेर पडला. त्याने नवीन गँग बनवली. बबलूने गँग बनवून अपहरणाचे काम सुरू केले. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रात त्याने वर्चस्व बनवले. अनेकांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचे काम तो करायचा.

त्याने लहान लहान टोळ्या बनवल्या होत्या. हळूहळू बबलू किडनॅपिंग किंग बनला. त्याच्या काळ्या कृत्याची यादी वाढतच गेली. पोलिसांनी यावर कठोर भूमिका घेतल्यानंतर तो भारतातून नेपाळमध्ये पळाला. नेपाळमध्ये बबलू माफिया डॉन मिर्झा दिलशाद बेगच्या संपर्कात आला. त्याच्या सांगण्यावरून तो १९९२ मध्ये दुबईला गेला.

मिर्झाच्या माध्यमातून तो दाऊद इब्राहिमपर्यंत पोहचला. मिर्झा बेग दाऊदच्या इशाऱ्यावर भारताविरोधात गुप्तहेराचे काम करायचा. दाऊदच्या भेटीनंतर बबलूची ताकद वाढली. आता तो अपहरण सोडून स्मगलिंगचा धंदा करू लागला. परदेशी शस्त्रे, ड्रग्सच्या तस्करीत तो दाऊदला साथ देऊ लागला. याच काळात १९९३ मध्ये मुंबईत सीरियल ब्लास्ट झाला. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद असल्याचे समोर आले. त्या घटनेने बबलूला धक्का बसला.

तो गुन्हेगारासोबत नव्हे तर एका देशद्रोह्यासोबत काम करतोय ते कळाले. या घटनेनंतर बबलूने दाऊदची साथ सोडली आणि तो छोटा राजनला सहभागी झाला. १९९५ मध्ये बबलूला सिंगापूरहून अटक करण्यात आली. तेव्हापासून तो बरेली जेलमध्ये बंद आहे. त्याच्याविरोधात अपहरण आणि हत्या असे गुन्हे आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.