Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:35 IST2025-12-19T17:26:22+5:302025-12-19T17:35:08+5:30

Anurag Dwivedi : एकेकाळी सायकलवरून फिरणारा अनुराग आज गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू, फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि डिफेंडर यासारख्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या आहेत.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील २६ वर्षीय युट्यूबर अनुराग द्विवेदी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकेकाळी सायकलवरून फिरणारा अनुराग आज गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू, फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि डिफेंडर यासारख्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या आहेत.

अनुरागने गावात आणि लखनौमध्ये आलिशान बंगले बांधले आहेत. मात्र आता ED ने त्याच्या घरावर छापा टाकला. १७ डिसेंबर रोजी ईडीचे पथक नवाबगंज येथील खजूर गावात अनुरागच्या घरी पोहोचले. त्यावेळी अनुराग घरी नव्हता.

तपासानंतर ईडीने घरातील चार आलिशान गाड्या जप्त केल्या, ज्यात लॅम्बोर्गिनी आणि मर्सिडीजचा समावेश आहे. ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या एप्सद्वारे अवैध मार्गाने अमाप पैसा कमावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

अनुराग द्विवेदी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, "आमचे कुटुंब भाड्याने घेतलेल्या कारने प्रवास करायचे. आज आमच्याकडे महागड्या आणि आलिशान गाड्यांचा ताफा आहे."

अनुरागने असंही सांगितलं की, २००७ पूर्वी त्याला क्रिकेटचे ज्ञान नव्हते आणि तो तो खेळ पाहतही नव्हता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंहने सहा षटकार मारल्यानंतर त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली.

मित्र संजीवने फॅन्टसी लीग स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवण्यास सांगितलं. मी २०० रुपयांनी खेळायला सुरुवात केली. नंतर मी २०००-३,००० रुपयांनी खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला मी काही पैसे हरलो आणि काही जिंकलो.

२०१७ मध्ये त्याने सहा आयपीएल सामने खेळले आणि ३.५० लाख रुपये जिंकले. त्यानंतर, हा ट्रेंड सुरूच राहिला आणि तो मोठ्या उंचीवर पोहोचू लागला. त्याने आधी स्विफ्ट कार घेतली, नंतर बीएमडब्ल्यू. आज त्याच्याकडे फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि डिफेंडर सारख्या महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.

१९९९ मध्ये जन्मलेला अनुराग द्विवेदी आज एक फॅन्टसी क्रिकेट एक्सपर्ट आणि विश्लेषक आहे. त्याने एक फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म तयार केला आणि तरुणांना फॅन्टसी क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला.

याआधी, तो अनेक फॅन्टसी लीग स्पोर्ट्स एप्सचा प्रमोटर आणि कंटेंट क्रिएटर देखील होता. तो आयपीएलमध्ये थेट गुंतवणूक करून नव्हे तर त्याच्या लोकप्रियतेद्वारे आणि ब्रँड असोसिएशनद्वारे कोट्यवधी रुपये कमवतो.

२२ नोव्हेंबर रोजी अनुराग द्विवेदीने दुबईमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. हे लग्न दुबईतील क्रूझवर झालं. नातेवाईकांसह सुमारे १०० लोक लग्नाला उपस्थित होते. अनुरागने त्यांच्या प्रवास तिकिटांची आणि राहण्याची व्यवस्था स्वतः केली.

अनुराग द्विवेदीच्या ग्लॅमरस लाईफस्टाईलने सर्वांचचं लक्ष वेधलं. लग्नानंतर एका महिन्यापेक्षा कमी वेळातच ईडी त्यांच्या घरी पोहोचली. गावात अशी चर्चा आहे की दुबईतील गावकऱ्यांनी किंवा नातेवाईकांनी लग्नाबद्दल ईडीकडे तक्रार केली, ज्यामुळे छापा टाकण्यात आला.

ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अनुरागवर कारवाई केली आहे. सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की अनुराग बेकायदेशीर उत्पन्नातून मिळवलेली मालमत्ता लपवण्याचा आणि ती वैध म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत होता.

अनुराग द्विवेदी सोशल मीडियावर, विशेषतः यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर त्यांचे ७ मिलियन सबस्क्राइबर आहेत. त्याच्यावर बेटिंग आणि जुगार एप्सचा प्रचार करण्यासाठी त्याच्या प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचा आरोप आहे.