Shraddha Walker Murder Case : मोठी बॅग घेतली, कॅबवाल्यांना फोन; श्रद्धाच्या मृतदेहाची 'अशी' विल्हेवाट लावणार होता आफताब पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:42 PM2023-01-27T15:42:08+5:302023-01-27T16:07:22+5:30

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आणखी एक सत्य समोर आलं आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताब अमीन पूनावाला तिच्या मृतदेहाची हिमाचल प्रदेशात विल्हेवाट लावणार होता.

पोलिसांनी आरोपपत्रात हे देखील उघड केले आहे की घटनेच्या दिवशी म्हणजे 18 मे 2022 रोजी नेमकं काय घडले? त्या दिवशी आफताबने श्रद्धाची हत्या का केली? आणि हत्येनंतर त्याने निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे का केले?. श्रद्धा हत्याकांडाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

श्रद्धा वालकरच्या मोबाईलमध्ये डेटिंग App होते. ज्या एपद्वारे तिची आफताबशी ओळख झाली. याच एप्लिकेशनच्या माध्यमातून श्रद्धाची हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका मुलाशी ओळख झाली. ही ती व्यक्ती होती, ज्याला भेटण्यासाठी श्रद्धा छतरपूर सोडून 17 मे 2022 रोजी गुरुग्रामला जात होती. त्या दिवशी सकाळीच ती घरातून निघून गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा त्या नवीन मित्राला भेटण्यासाठी पहिल्यांदा गुरुग्रामला गेली होती. गुरुग्रामला गेल्यानंतर त्या संध्याकाळी श्रद्धा घरी परतली नाही. श्रद्धा कुठे गेली याची आफताबला काळजी वाटत होती. मोबाईलवरही ती उत्तर देत नव्हती. त्यामुळे आफताब रात्रभर अस्वस्थ होता.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा छतरपूरच्या फ्लॅटवर परतली. पोलिसांना 18 मेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून, त्यात श्रद्धा फ्लॅटमध्ये शिरताना दिसत आहे. फ्लॅटमध्ये शिरताच आफताब समोर आला. तो आधीच रागावला होता. श्रद्धाला पाहताच आफताबला राग आला आणि त्याने रात्रभर कुठे होतीस असा प्रश्न विचारला.

आफताबच्या प्रश्नाला श्रद्धाने प्रत्युत्तर दिलं, तुला काय करायचंय? मला वाटेल ते मी करेन. श्रद्धाचे उत्तर ऐकून आफताब संतापला आणि त्याने श्रद्धाला मारहाण केली. मात्र, काही वेळाने दोघेही नॉर्मल झाले. यानंतर दोघांनी ऑनलाईन जेवण ऑर्डर केले. पण जेवण करण्यापूर्वीच आफताबने पुन्हा एकदा श्रद्धाला विचारपूस सुरू केली.

दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची?

आफताबने मृतदेह हिमाचल प्रदेशात नेऊन लपवण्याचा कट रचला. त्याने विचार केला की आपण श्रद्धाचा मृतदेह एका बॅगमध्ये टाकून हिमाचलला नेऊन मृतदेह तिथे ठेवू. यानंतर आरोपी आफताब अमीन हा पूनावाला मार्केटमध्ये गेला आणि तेथून 1200 रुपये किमतीची काळ्या रंगाची मोठी बॅग विकत घेतली.

आफताबने काही ट्रॅव्हल एजंटला बोलावून कॅब बुक करण्यासाठी त्यांच्याशी बोलणे सुरू केले. पण त्याचवेळी आरोपी आफताबने विचार केला की, मृतदेह बॅगेत भरून कॅबमध्ये नेला तर दिल्लीहून हिमाचल प्रदेशला जात असताना महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तपासणी केली जाते.

अशा परिस्थितीत आफताबची ही योजना अयशस्वी होऊ शकते. असा विचार करून आफताबने हा प्लॅन रद्द केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यनंतर आफताबने ठरवले की तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जंगलात फेकून देईल.

आफताबने त्याच रात्री फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. एकीकडे श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला आणि दुसरीकडे त्याने श्रद्धाचा मोबाईल फोन वापरून श्रद्धाला लोकांमध्ये जिवंत ठेवलं तपासात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब श्रद्धाचा मोबाईल वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

श्रद्धाच्या मोबाईलवर कॉल आला तर आफताब तो कॉल रिसिव्ह करून निघून जायचा, आफताबने विचार केला की, येत्या काही दिवसांत खून प्रकरणाचा उलगडा झाला आणि तपास पथकाने श्रद्धाचा मोबाईल शोधला तर श्रद्धा जिवंत आहे हे सर्वांना समजावे.