श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा; "आफताबनं तिच्या शरीराची हाडे...."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:09 PM2023-01-14T12:09:42+5:302023-01-14T12:13:51+5:30

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. या घटनेत सहा महिन्यांनी पोलीस आरोपी आफताबपर्यंत पोहचली. त्यानंतर पोलीस चौकशीत त्याने केलेल्या कबुलीनं सगळ्यांना धक्काच बसला.

श्रद्धा वालकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या २३ हाडांचे पोस्टमॉर्टम केले आहे. दिल्ली एम्समध्ये मंगळवारी केलेल्या पोस्टमॉर्टमच्या विश्लेषणात हाडे करवतीने कापण्यात आल्याचे समोर आलं आहे.

दिल्ली पोलीस या प्रकरणी साकेतमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करू शकतात. श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्याला पॉलीग्राफ चाचणीला सामोरे जावे लागले होते.

पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले होते. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईत राहायचे आणि काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

आफताबने सांगितले होते की, १८ मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले होते. यानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते.

आफताब रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला.

आफताबने श्रद्धाच्या खात्यातून ५४ हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी १२ नोव्हेंबरला अटक केली होती.

हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने मंगळवारी हा निकाल दिला. यावेळी न्यायालयासमोर आफताबने कोठडीत वाचण्यासाठी कायद्याची काही पुस्तके मागितली आहेत.

आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शुक्ला यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना आफताबला उबदार कपडे देण्याची सूचना केली. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी न्यायालयाने पूनावालाच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ केली होती. १५ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला तिहार तुरुंगातून सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये आणले होते.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील माइटोकॉन्ड्रियल डीएनए चाचणी अहवाल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. श्रद्धा हिची हाडे व केसांचे नमुने जुळले आहेत. हैदराबाद येथील सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स या संस्थेने ही तपासणी केली आहे.