251 रुपयांचा मोबाईल आठवतोय? मालक आता ड्रायफ्रूट खरेदी-विक्री करतोय; 200 कोटींना ठकविले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 01:18 PM2021-01-12T13:18:33+5:302021-01-12T13:27:49+5:30

Freedom 251 fraud MD Mohit Goyal Arrested: या स्कीमची आज आठवण व्हायचे कारण म्हणजे रिंगिंग बेल कंपनीचा मालक. तो तेव्हाही फेक होता आजही आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सेक्टर 62 मध्ये एक एफएमसीजी प्रॉडक्टची बोगस कंपनी काढली होती. याद्वारेही त्याने 200 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

साधारण चार-पाच वर्षांपूर्वी एक भन्नाट ऑफर आली होती. फक्त 251 रुपयांत स्मार्टफोन, होय थोडा आठवणींना ताण दिला तर रिंगिंग बेल या नोएडातील कंपनीने स्मार्टफोन 251 रुपयांत देण्याची स्कीम आणली होती. यावर लाखोंच्या उड्या पडल्या होत्या. तुमच्या कार्यालयातील, शेजारी-पाजाऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनही केले होते. पुढे काय झाले? तो फोन आला की नाही त्यांच्याशिवाय कोणालाच माहिती नाही.

या स्कीमची आज आठवण व्हायचे कारण म्हणजे रिंगिंग बेल कंपनीचा मालक. तो तेव्हाही फेक होता आजही आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सेक्टर 62 मध्ये एक एफएमसीजी प्रॉडक्टची बोगस कंपनी काढली होती. याद्वारेही त्याने 200 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

रिंगिंग बेलचा एमडी मोहित गोयल आणि ओमप्रकाश जांगीड यांना पोलिसांनी अटक केली आहे. रिंगिंग बेलने 2015 मध्ये केवळ 250 रुपयांत अँड्रॉईड फोन देण्याच्या नावाखाली करोडो रुपयांना ठकविले होते.

पोलिसांनी आरोपींकडून एक ऑडी कार, एक इनोव्हा कार आणि 60 किलो ड्राय फ्रूटचे सँम्पल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त लव कुमार यांनी सांगितले की, आरोपींना सेक्टर-62 मध्ये कोरेंथम टॉवरमध्ये दुबई ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हब नावाची कंपनी उघडली होती. जांगिडला या कंपनीचा एमडी बनविले होते. तर मोहित या कंपनीचा प्रमोटर होता.

हे दोघे देशभरातून ड्राय फ्रूट, डाळ, तेल, मसाले आदी खरेदी करत होते. या विक्रेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी ते त्यांना काही प्रमाणावर पैसे आगाऊ देत असत. यानंतर विक्रेत्यांकडून लाखो रुपयांचा माल उचलत असत, मात्र त्यानंतर ते विक्रेत्यांना पैसे देत नव्हते.

ही फसवणूक जवळपास 500 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हबच्या 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात व्यापारी रोहित मोहन यांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा गोरखधंदा उघड झाला आहे. 2018 पासून हा धंदा सुरु केला होता.

फसवणूक झालेले व्यापारी जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी यायचे तेव्हा हे लोक गँगस्टर, बाऊन्सरांची मदत घेत असत. तसेच या व्यापाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असत.

राजस्थानच्या पाच व्यापाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून उलट 25 लाख रुपये वसूल करण्याच्या आरोपाखाली रिंगिंग बेलचा एमडी मोहित दिल्लीच्या तुरुंगाची हवा खाऊन आला आहे.

कंपनीमध्ये भामट्याने परदेशातील महिलेला रिसेप्शनिस्ट ठेवले होते. तिला भलेमोठे पॅकेज देण्यात आले होते. तसेच ऑफिसमध्ये 56 लोक ककाम करत होते. त्यांना 25 लाख रुपये महिना पगार दिला जात होता.

याशिवाय डील करणाऱ्या दलालाला दोन टक्के कमिशनही दिले जात होते. ऑफिसवर लावलेल्या बोर्डाची किंमतच पाच लाख रुपये होती. अशा प्रकारे हाय़फाय थाट दाखवून व्यापाऱ्यांना लुटले जात होते.

Read in English