मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:21 IST2025-04-24T12:08:37+5:302025-04-24T12:21:50+5:30

गेल्या पाच दिवसांपासून शहरात प्रामुख्याने डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येबद्दल चर्चा सुरू आहे. आरोपी मनीषाने डॉक्टरांना 'तो' मेल केला अन् त्यामुळेच ते व्यथित झाले. या मेलमध्ये नेमके काय होते याबद्दल लोकांमध्ये उत्कंठा आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून त्या मेलमधील सारांश प्राप्त झाला आहे. यात तिने '...तरीही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताय?' असा सवाल उपस्थित केला आहे.

वळसंगकर हॉस्पिटलमध्ये प्रशासनाधिकारी असलेल्या मनीषाने डॉक्टरांना पाठविलेल्या मेलचा आशय असा आहे की, ती म्हणते.. २००८ साली हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. सहा महिने पगारही नव्हता. त्यानंतर प्रतिमहिना ३ हजार रुपये पगारावर नियुक्ती झाली.

बिलिंग, हॉस्पिटल सामानांची यादी बनवणे. रिसेप्शनिस्ट टेलिफोन ऑपरेटर, जनरल सुपरवायझर, नर्सिंग सुपरवायझर, ओपीडी असिस्टंट, स्टोअर किपर, आयपीडी कलेक्शन आणि व्यवस्थापन या पदांपर्यंत काम करताना आवाक्याबाहेरचीही कामे केल्याचा या ई-मेलमध्ये उल्लेख आहे.

आठ तासांच्या पगारीमध्ये २४ तास कामे केली. कामाच्या तुलनेत पगारीवर शंका नव्हती. पगारवाढ मागितली की, मुलं मोठी झाल्यावर मदत करतो, असे डॉक्टरांनी आश्वासन दिले.

हॉस्पिटलच्या बांधकामाच्या वेळी कमरेला पाणी साचायचे. लाईट नसायची. जनरेटरजवळ कोणी जाऊ शकत नव्हते. साचलेले पाणी बाहेर टाकले. आपल्यावर विश्वास असलेले लोक कोठे होते? अतिक्रमण काढायच्या वेळी लोकांशी भांडले.

रात्री-अपरात्री फोन आल्यास त्वरित हजर राहायची. कोविडच्या काळात २०-२२ तास काम केले. बाकी सर्वांना डबल पगार दिला. मला फॅमिली मेंबरला द्यायची काय गरज आहे, असे म्हटले गेले.

मग, आता सदस्य कामगार झाला काय? असाही सवाल या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. संस्थेत योगदान नसलेल्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप करताहेत. कौटुंबिक वादात मला ओढताहेत.

पोरांचे उच्च शिक्षण सुरू आहे. आता कुठे स्थिरावत असताना मला मानसिक छळ सहन होत नाही. माझे अधिकार मला न सांगता काढून घेतले त्याचे मला कारण हवे आहे, असेही या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

माझा पगार कमी करून माझी कोंडी करताय. मी मा‍झ्या कामात कधीही कसूर केली नाही. तरीही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताय. माझा छळ होतोय जेणेकरून मी काम सोडून जावं. मला पगार कमी देणार असाल तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे या ईमेल-मध्ये नमूद केले आहे.