Ayesha Suicide: “मी तुझ्यावर प्रेम करते कुकू, चूक माझी नव्हती, पण....”;आत्महत्येपूर्वीचं आयशाचं शेवटचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 08:26 PM2021-03-06T20:26:43+5:302021-03-06T20:30:35+5:30

Ayesha Suicide: अहमदाबाद येथे आत्महत्या केलेल्या आयशाचं शेवटचं पत्र तिच्या वडिलांनी कोर्टासमोर सादर केले, या पत्रात तिने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सगळंकाही लिहिलं होतं.

अहमदाबाद शहरातील साबरमती नदीत एका २३ वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केली होती, आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीने तयार केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, आयशाच्या आत्महत्येवर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दु:ख आहे हे समजून घेण्यासाठी कदाचित तिच्या ओळखीच्या लोकांना उशीर झाला होता.

आयशा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत, याच दरम्यान आयशा आत्महत्या प्रकरणात तिच्या वडिलांनी आणि वकिलांनी कोर्टासमोर एक पत्र दिलं, जे आयशाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या पतीसाठी लिहून ठेवलं होतं, यात आयशाने तिच्यावर घडत असलेल्या प्रसंगाचा खुलासा केला होता.

मागील काही दिवसांपासून अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या आयशाचा व्हिडीओ देशभरात चर्चेत आहे. लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून आयशाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. आयशाच्या आत्महत्येनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी हालचाल सुरु केली, पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेत राजस्थानच्या पाली येथून आयशाचा पती आरिफला अटक करण्यात आली आहे.

यावेळी शनिवारी आत्महत्या प्रकरणात जेव्हा आरिफची पोलीस कस्टडी संपत असताना त्याला पुन्हा कोर्टासमोर हजर केले, तेव्हा आयशाच्या वडिलांचे वकील जफर पठाण यांनी कोर्टासमोर आयशाद्वारे लिहिलेलं पत्र सादर केले. हे पत्र आयशाने आरिफसाठी लिहिलं होतं, ज्यात म्हटलं होतं की, तुझं दुष्कर्म लपवण्यासाठी तू माझं नाव आसिफसोबत जोडलं, पण तो माझा खूप चांगला मित्र आणि चांगला भाऊ होता.

पत्रात आयशानेही आरिफच्या माध्यमातून स्वतःवर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं होतं, आयशाने लिहिलं होतं की तू मला ४ दिवस खोलीत बंद केले होते, ना मला अन्न दिलं ना पाणी आणि त्यावेळी मी गरोदर होते. तरीही तू मला मदत करायला आला नाहीस आणि जेव्हा आला तेव्हा मला खूप मारहाण केलीस, ज्यामुळे माझा छोटा आरू आसिफ मरण पावला, आता मी त्याच्याकडे जात आहे.

या पत्रात आयशाने पुढे असंही लिहलंय की, मी तुला कधी फसवले नाही, तू हसत खेळत दोन जीवांचा नाश केलास. मी तुझ्यावर प्रेम करते कुकू, मी चूकीची नव्हती, पण तुझा स्वभाव चूकीचा होता. मी तुझ्या डोळ्यांवर फिदा होते, पण पुढच्या आयुष्यातच मी हे सांगू शकेन का? हे लिहिल्यानंतर आयशाने लव्ह यू, तुमची पत्नी आयशा आरिफ असं लिहिलं आहे.

आरिफचा तीन दिवसांचा रिमांड संपल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी कोर्टात सांगितले की, त्यांच्याकडे आता आरिफविरूद्ध पुरावे आहेत, यामुळे त्यांना आरिफची पोलिस कोठडी नको आहे, कोर्टाने आरिफला न्यायालयीन कोठडीसाठी पाठवले आहे.

यासह या आत्महत्येप्रकरणी चौकशी करणाऱ्या रिव्हर फ्रंट पोलिसांना आयशा आणि आरिफ दोघांचे मोबाईल मिळाले आहेत. आता पोलिसांना हे पत्र देखील प्राप्त झाले आहे, न्यायालयीन तपासणीनंतर दोषारोपपत्र दाखल केले जाईल.

यापूर्वी आयशा आत्महत्या प्रकरणात पोलिसांना ७० मिनिटांच्या रेकॉर्डिंगमध्ये असे आढळले आहे की, आत्महत्येपूर्वी आयशाचं तिचा नवरा आरिफसोबत बोलणं झालं होतं, या संभाषणात आरिफ आयशाला तू मर आणि तुझ्या मृत्यूचा व्हिडीओ पाठवं असं सांगत होता.

आरिफचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध होते, असा आरोपही आयशाच्या कुटूंबाने केला आहे. आता पोलीस मोबाईल डेटाद्वारे हेदेखील तपासून पाहत आहेत की, आरिफचा खरोखरच दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध होता का? असेल तर ती मुलगी कोण आहे आणि म्हणूनच आरिफ आणि आयशात भांडणं होत होती का? याचा तपास होईल.

तीन वर्षापूर्वी आयशाचे लग्न झाले होते तेव्हा मुलीच्या लग्नासाठी आयशाच्या वडिलांनी घर विकले होते. पण तरीही आयशाचा पती आरिफचे मन भरले नाही. तो सतत हुंड्याची मागणी करत होता

आयशाने २०२० मध्ये अहमदाबादच्या वटवा पोलिस ठाण्यात आरिफ आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध हुंड्यामुळे छळ होत असल्याचा गुन्हा दाखल केला होता. ज्यासाठी आरिफ आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली. यानंतर आरिफच्या कुटुंबीय जामिनावर सुटले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफने आयशाशी लग्न केले पण त्याचे राजस्थानमधील दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध होते. आयशासमोर व्हिडिओ कॉलमध्ये तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत असे. आणि हुंड्याच्या नावाखाली आयशाच्या घरातील सदस्यांकडून घेतलेला पैसा घेऊन तिच्या मैत्रिणीवर लुटत असे. या कारणास्तव आयशा नैराश्यात होती. पण जेव्हा आयशाच्या बाळाचा पोटात मृत्यू झाला तेव्हा तिची जगण्याची आशा संपली.

आरिफच नव्हे तर आयशाच्या सासरच्यांनीही तिच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला नाही. तर दोन कुटुंबांचे नाते आयशा आणि आरिफच्या लग्नाआधीच होते. गुजरातच्या अहमदाबाद येथे २५ फेब्रुवारी रोजी आयशाने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली तेव्हा ही संपूर्ण बाब चर्चेत आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला होता, ज्यात तिनं म्हटलं होतं, मला आयुष्य आरामात जगायचं आहे त्यामुळे मी देवाकडे जात आहे.

टॅग्स :पोलिसPolice