पोलीस उपनिरीक्षकानं लॉकडाऊनमध्ये लग्न केलं अन् होम क्वारंटाईनमध्ये स्वत:वर गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 04:10 PM2020-08-11T16:10:43+5:302020-08-11T16:13:55+5:30

राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडूला स्पोर्ट्स कोट्यातून पोलिसात नोकरी मिळाली आणि त्याला पदोन्नती मिळून सहाय्यक उपनिरीक्षक बनला. दोन महिन्यांपूर्वीच त्याने लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते आणि लग्न झाल्यापासून तो होम क्वारंटाईनमध्ये राहत आहे. मात्र याच दरम्यान जेव्हा पत्नीशी वाद झाला, तेव्हा त्याने एका खासगी रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली.

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. जमशेदपूरच्या गोलमुरी येथे पोलीस लाइनमध्ये तैनात सहायक उपनिरीक्षक तरुण पांडे यांनी स्वत:ला गोळ्या घातल्या आहेत. एएसआय आपल्या पत्नीसमवेत गोलमुरी पोलिस लाईनवरील तिसऱ्या मजल्यावरील प्लॅटमध्ये राहत होता.

मयत हा पहिल्यांदा कॉन्स्टेबल होता आणि नुकतीच त्याला एएसआय पदावर बढती देण्यात आली. तो पदोन्नतीनंतर ड्युटी करत होता परंतु काही दिवसांपासून होम क्वारन्टाईनमध्ये होता.

एएसआयने तरुणने जून महिन्यातच लग्न केले होते. तरुण पांडे हा एक उत्तम खेळाडू होता आणि त्याला क्रीडा कोट्यातून पोलीस विभागात नोकरी लागली होती.

सोमवारी दुपारी तरुण पांडे आणि त्याच्या पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद वाढल्यानंतर त्याने एका खासगी रिव्हॉल्व्हरने स्वत: ला गोळी झाडून घेतली.

गोळीचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला, पत्नीचा आवाज ऐकून शेजारी लोक मदतीसाठी आले. तेव्हा त्यांना तरुण रक्तरंजित अवस्थेत आढळला, त्याला रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी तरुणला मृत घोषित केले.

एएसआयने त्याच्या स्वत: च्या डोक्यावर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली, त्यामुळे त्याचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. एएसआय नालंदा बिहार शरीफ येथील रहिवासी असल्याचे सांगितलं जात आहे. त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा नालंदा येथील परवाना होता. पोलीस याचा तपास करत आहे. या प्रकरणात गोलमुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जमशेदपूरच्या एसएसपी आणि सिटी एसपी यांच्यासह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी करत आहेत.

त्याचबरोबर या घटनेबाबत एसएसपीने सांगितले की, झारखंड पोलीस स्पोर्ट्स कोट्यातून तरुण पांडे भरती झाला होता. यापूर्वी तो बीएसएफमध्ये तैनात होता. त्यांचा स्वभाव प्रेमळ असल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच त्याचा विवाह मागच्या जूनच्या महिन्यात झाला होता आणि लग्नानंतर परतल्यानंतर तो होम क्वारंटाईनमध्ये होता. त्यांनी ही घटना का घडली याचा शोध घेत असल्याचं सांगितले आहे. सध्या या घटनेनंतर गोलमुरी पोलिस लाईन परिसरात खळबळ उडाली आहे.

Read in English