फेसबुकवर मैत्री, फोनवर रचलं षडयंत्र, मग...; असदुद्दीन ओवैसींच्या हल्ल्याबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:44 PM2022-02-04T15:44:07+5:302022-02-04T15:50:10+5:30

Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. त्यात ओवैसींवर झालेल्या हल्ल्यानं राजकीय वातावरण पेटलं आहे.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणी पकडलेल्या आरोपींचा पोलीस तपास सुरु आहे. सुरुवातीच्या तपासात आरोपींनी या हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहे.

हल्लेखोरांनी ओवैसी यांच्यावर हल्ल्याचं संपूर्ण प्लॅनिंग रचलं होतं. त्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. दोघंही हल्लेखोर आधीपासूनच सज्ज होते. ओवैसी यांच्या गाड्यांचा ताफा जसा टोल नाक्यावर पोहचला तेव्हा ते दोघं जवळ गेले. गाड्यांचा वेग कमी होताच ओवैसी यांच्या कारवर गोळी चालवली.

या हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांनी गोळी कारच्या खालच्या बाजूस झाडली. हल्ल्यासाठी ओवैसी येण्यापूर्वीच एक दीड तास ते आधी पोहचले होते. या हल्ल्याबाबत पोलिसांनी ओवैसी यांचा ड्रायव्हर यामीन याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

ओवैसी घटनास्थळावरुन निघाल्यानंतर तातडीनं एएसपींना फोन केला. त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सुरुवातीला टोल नाका परिसराच्या आसपास स्फोट झाल्याचं वाटलं. परंतु दुसरी गोळी झाडल्यानंतर फायरिंग होत असल्याचं ते म्हणाले. हल्लेखोरांच्या निशाण्यावर ओवैसी यांची कार होती. या घटनेची माहिती ओवैसी यांनी ट्विट करुन दिली.

या हल्ल्यात आरोप केलेल्या आरोपी सचिनच्या चौकशीत कळालं की, शुभमसोबत त्याची मैत्री फेसबुकवरच झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना नंबर शेअर केले. फोनवरुन ओवैसींवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं. मित्राकडून पिस्तुल घेतली होती. हल्ल्याच्या आधी दोघंही भेटले आणि एका कारने टोल नाक्याला पोहचले.

पोलिसांच्या चौकशीत सचिन आणि शुभम म्हणाले की, आम्ही कुठल्याही पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते नाही. असदुद्दीन ओवैसी यांच्यापेक्षा त्यांचा अकबरुद्दीन यांच्यावर आम्ही नाराज होतो. अनेक दिवसांपासून हल्ला करण्याचा प्लॅन करत होतो असं त्यांनी सांगितले.

इतकचं नाही तर ओवैसी यांचा जीव घेण्याचा आमचा हेतू नव्हता. केवळ द्वेषाचं राजकारण सोडून द्या यासाठी हा इशारा देण्यात आला. ओवैसी यांच्या जीविताचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही जाणुनबुजून गाडीच्या खालच्या बाजूस गोळी झाडली होती असं आरोपींनी सांगितले.

ओवैसींच्या विधानानं सचिन नाराज होता. देशभक्त सचिन हिंदू नावानं फेसबुकवर प्रोफाईल आहे. सचिन नेहमी धार्मिक पोस्ट करत असतो. अनेक भाजपा नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. नेत्यांच्या वाढदिवशी तो पोस्ट करत असतो. सचिन अविवाहित असून वडील कंपनीत मजूर म्हणून काम करतात.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवैसी यांनीच ट्विट करून गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती दिली होती.

ओवैसी हल्ल्याप्रकरणी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे ओवैसींवर हल्ला केला म्हणून हिंदू सेना आरोपींना कायदेशीर मदत आणि आर्थिक सहाय्य करणार असल्याची माहिती हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी सांगितले.