दुबईहून ट्रॉली बॅगमधून आणल्या १० एअर गन, विमानतळावर कस्टम विभागाने केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 01:09 PM2022-07-20T13:09:43+5:302022-07-20T13:44:56+5:30

Custom Department Action : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेली बंदूक आणि त्याचे भाग पुरातन आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत 20.54 लाख रुपये आहे. रायफल बनवण्यासाठी ती भारतात मॉडिफाय केली जाणार होती, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : सीमाशुल्क विभागाने 20 लाखांहून अधिक किमतीच्या एअर गन, टेलिस्कोपिक आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. सीमाशुल्क विभागाच्या लखनौ युनिटने ही जप्ती केली आहे. दिल्ली कस्टम्सच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या CCSI कस्टम टीमने विमानतळावर तपासणीदरम्यान एअर गन, टेलिस्कोपिक साईट्स आणि शस्त्रांमध्ये वापरलेले भाग जप्त केले. ही शस्त्रे दुबईहून फ्लाइट क्रमांक IX-194 वरून आली होती. (Photo - News18)

प्रत्यक्षात, १९ जुलै रोजी कस्टमच्या टीमने एपीआयएस प्रोफाइलिंगच्या आधारे एका प्रवाशाला अडवले जो कस्टम ड्युटी न भरता ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत होता.त्यांच्या सामानाची तपासणी करताना १० एअर गन, टेलिस्कोपिक आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर चौकशी केली असता त्याच्याकडे परवान्याची कागदपत्रे नव्हती.

सीमा शुल्क कायदा 1962, बॅगेज नियम 2016, फॉरेन ट्रेड (डीअँडआर) कायदा 1992 आणि शस्त्रास्त्र नियम 2016 चे उल्लंघन केल्याबद्दल माल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी (आर्थिक गुन्हे)समोर हजर करण्यात येणार आहे. तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे.