Adani समूहामुळे तुमच्या LIC पॉलिसीचे पैसे बुडणार का? गुंतवणुकीचे काय होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:58 AM2023-02-04T11:58:33+5:302023-02-04T12:11:39+5:30

तुमच्याकडे किती LIC पॉलिसी आहेत? LICची अदानी समूहातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे? पाहा, डिटेल्स...

अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. याशिवाय अदानी समूहातील गुंतवणूकदारांनाही कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. अदानी समूहाच्या विविध कंपन्यांचे शेअर LIC सह अन्य कंपन्यांनी घेतले होते. अदानी समूहाच्या पडझडीमुळे LIC चे आतापर्यंत ६४ हजार कोटी रुपये बुडाल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच LICची पॉलिसीधारकांमध्ये काळजीचे वातावरण तयार झाले.

अदानी समूहाच्या पडझडीमुळे LIC पॉलिसी किंवा LIC मध्ये करण्यात आलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे का? पॉलिसीमध्ये गुंतवलेले पैसे बुडतील का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. अदानी समूहाच्या पडझडीनंतर लगेचच LIC कडून एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण देण्यात आले होते. तरीही पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

LICने अदानी समूहात ३६ हजार ४७४.७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध होण्याआधी या गुंतवणुकीची व्हॅल्यू ७७ हजार कोटी इतकी होती. अदानी समूहाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा एलआयसीच्या कमाईवर नक्कीच परिणाम झाला आहे.

LICने एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, अदानी प्रकरणात घाबरण्याची गरज नाही. एलआयसीची एकूण संपत्ती ४१.६६ लाख कोटींहून अधिक आहे. याचा अर्थ अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

LIC पॉलिसीधारक किंवा गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा कोणतीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करते तेव्हा तुम्ही दिलेल्या हप्त्यातून जमा झालेले पैसे विमा कंपनी मार्केटमध्ये गुंतवते, तेथे झालेल्या फायद्यातून तुमचे क्लेम दिले जातात. विमा कंपन्यांचा क्लेम परत करण्याचा वेग कमी असल्यामुळे ते मार्केटमध्ये दिर्घ काळाचा विचार करून गुंतवणूक करतात.

याच एका कारणामुळे विमा कंपन्यांचा नेहमी हा प्रयत्न असतो की तुम्ही मोठ्या कालावधीचा विमा घ्यावा, तुमचे आयुष्य दिर्घकाळ असावे. जितके दिवस तुमचा पैसा विमा कंपनीकडे असेल तितके दिवस ते या पैशातून कमाई करतील. दुसरीकडे, अदानींचे शेअर घसरले आहेत. त्यामुळे LICचे नुकसान होत आहे. आगामी काळात या शेअर्सची किंमत वाढली तर LICला नफा होईल.

LICने अदानी समूहाशिवाय अन्य अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. LICने शेअर बाजारातील ३६ कंपन्यांमध्ये १० लाख कोटींहून अधिक रक्कम गुंतवली आहे. जर अदानी समूहातील त्यांच्या गुंतवणुकीची तुलना केली तर ती १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

LICने त्यांच्या गुंतवणुकीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. LICने स्पष्टपणे म्हटले आहे की, गुंतवणुकीसाठी संस्थांसाठी निश्चित केलेल्या रिक्स मॅनेजेमेंट फ्रेमवर्कच्या आतच ही गुंतवणूक देखील केली आहे. दीपमचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की, LICच्या गुंतवणुकीबाबत आता घाबरण्याची गरज नाही. त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे.

जर तुमच्याकडे LICची पॉलिसी असेल तर इतकी काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर LICच्या विमाधारकांनी अदानी प्रकरणावरून घाबरण्याची गरज नाही. एलआयसी एका सुरक्षित सिक्योरिटीजच्या अंतर्गत येते. त्यांच्याकडे रेटेड बॉन्ड्स आणि इक्विटी आहेत. ते एका सुरक्षित धोरणानुसार गुंतवणूक करतात.

२० सप्टेंबर २०२२ पर्यंत एकूण AMU अर्थात असेट अंडर मॅनेजमेंट ४१ लाख ६६ हजार कोटी इतके होते. इथे AMUचा अर्थ असा पैसा जो विमा कंपन्या बाजारात मॅनेज करतात. अदानीमधील LICची गुंतवणूक ३६ हजार ४७४ कोटी आहे जी त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुंतवणूक कमी म्हणजे धोका देखील कमी.

दरम्यान, अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. अदानी समूहाने स्वत:च्या खात्यात अनेक हेरफेर केले आहेत. समूहने स्वत:च्या कंपन्यांचे शेअर ओव्हर प्राइस करून दाखवले आहेत. या रिपोर्टमध्ये अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले होते.

त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या काळात अदानी समूहाचे शेअरमध्ये मोठी घसरण झाली. फक्त १० दिवसात अदानी यांनी ९ लाख कोटीहून अधीक रक्कम गमावली. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची काळजी वाढली.