Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:49 IST2026-01-10T09:40:51+5:302026-01-10T09:49:36+5:30

Sukanya Samriddhi Yojana Calculator: आजकाल गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. वाढती महागाई आणि इतर खर्च पाहता भविष्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे.

Sukanya Samriddhi Yojana Calculator: आजकाल गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. वाढती महागाई आणि इतर खर्च पाहता भविष्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. गुंतवणूकीसाठी सरकारनंही अनेक चांगल्या स्कीम्स आणल्या आहेत. यामध्ये कमी जोखीम आणि चांगला परतावा मिळतो.

मुलीच्या जन्मानंतरच पालकांना तिच्या शिक्षणाची आणि भविष्याची काळजी वाटत असते. वास्तविक हे दीर्घकालीन नियोजन असते, परंतु योग्य वेळी गुंतवणूक केल्यास तुमचा मार्ग सोपा होतो. मुलीच्या शिक्षण किंवा लग्नाच्या खर्चाची सोय करण्यासाठी 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेत तुम्ही दरवर्षी १ लाख रुपयांची गुंतवणूक करून ४५ ते ४७ लाख रुपयांपर्यंतची तरतूद करू शकता.

या योजनेअंतर्गत खाते केवळ मुलीच्या कायदेशीर पालकांद्वारेच उघडलं जाऊ शकते, जे मुलीचे बायोलॉजिकल आई-वडील किंवा न्यायालयानं नियुक्त केलेले पालक असावेत. मुलीचे खाते वयाची १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी उघडणे आवश्यक आहे.

खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे हा या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होणार असेल, तरच हे खातं मुदतीपूर्वी बंद करण्याची परवानगी आहे. याव्यतिरिक्त, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील उर्वरित रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम अंशतः काढण्याची परवानगी आहे.

या योजनेअंतर्गत व्याजदर ८.२% आहे. हा लाभ पूर्णपणे करमुक्त (Tax Free) असून सरकार वेळोवेळी यात बदलही करत असते. हे खाते उघडण्यासाठी पालकांना पॅन कार्डची प्रत, पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि मुलीच्या नोंदणीकृत जन्म दाखल्याची एक प्रत जमा करावी लागेल.

या योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक ₹२५० आणि कमाल ₹१.५० लाख आहे. खातं सक्रिय ठेवण्यासाठी, पालकांना पहिल्या १५ वर्षांपर्यंत प्रत्येक आर्थिक वर्षात किमान एकदा पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर २१ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत खात्यावर व्याज मिळत राहील, त्यामुळे पुढे कोणत्याही ठेवीची गरज नसते. जर खातं एकदा निष्क्रिय झाले, तर ₹५० चा दंड भरून ते पुन्हा सक्रिय केलं जाऊ शकतं.

४७ लाख रुपयांहून अधिक निधीचं नियोजन कसं कराल? यासाठी तुम्हाला दरवर्षी किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ₹१५,००,००० असेल. याचं मॅच्युरिटी वर्ष २०४७ असेल. दरम्यान मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ₹४७,८८,०७९ असेल. यामध्ये ₹३२,८८,०७९ च्या व्याजाचा समावेश असेल.