सेल्समन म्हणून काम केलं, मेहनतीनं उभी केली कोट्यवधींची कंपनी; गॅरेजमध्ये असं सुरू झालं भारताचं 'गुगल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 09:50 AM2023-11-25T09:50:32+5:302023-11-25T10:04:43+5:30

लहान मुलांच्याही तोंडी त्यांच्या कंपनीचं नाव होतं. ही कंपनी अशी होती की दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही.

'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है।' चित्रपटातला हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. व्हीव्हीएस मणी (VSS Mani) यांच्यासोबतही काही असंच झालं. त्यांच्याकडे ना पैसा होता, न बिझनेसचा अनुभव त्यांच्याकडे होती ती म्हणजे मेहनत आणि जिद्द. हीच त्यांची ताकद ठरली आणि त्यांनी याच्याच जोरावर भाड्यानं गॅरेज घेऊन भारतीय गुगल तयार केलं.

कोणताही नंबर शोधायचा, दुकानाचा नंबर असो किंवा काम करणाऱ्या व्यक्तीचा, अथवा कोणत्या रेस्तराँ किंवा हॉटेलचा, केवळ एक नंबर डायल करा आणि तुमच्या समोर संपूर्ण लिस्ट येईल. लहान मुलांच्याही तोंडी त्यांच्या कंपनीचं नाव होतं. ही कंपनी अशी होती की दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही. कालांतरानं त्यांनी यातील भागीदारी खरेदी केली. ही कहाणी आहे कंपनी जस्ट डायलची (Just Dial).

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या व्हीव्हीएस मणी यांचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीत कॉमर्सला प्रवेश घेतला. सोबतच ते सीएची तयारीही करू लागले. परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं आणि सेल्समन म्हणून नोकरी सुरू केली.

यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी काम केलं. परंतु त्यांच्या मनात आपलं काही सुरू करावं अशी इच्छा होती. परंतु त्यांच्याकडे अनुभव आणि पैसा दोन्ही नव्हतं. त्यांनी १९८९ मध्ये आपल्या मित्रासह AskMe नावाची कंपनी सुरू केली. परंतु त्यात यश मिळालं नाही.

मणी यांनी यानंतरही हार मानली नाही. १९९२ मध्ये त्यांनी वेडिंग प्लॅनर मॅगझिनचं काम सुरू केलं. परंतु या कामातही त्यांना अपयश आलं. व्यवसायात दोनदा अपयश मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

मणी यांनी ज्या ठिकाणी नोकरी केली तिकडे येलो पेजेस आणि टेलिफोन डिरेक्टरीशी निगडीत कामं व्हायची. इथूनच त्यांना जस्ट डायलची आयडिया आली. मणी यांच्या पत्नीनंही त्यांना साथ दिली. त्यांनी आपले दागिने त्यांना दिले आणि एफडीमधून काही पैसे काढून त्यांनी एका गॅरेजमध्ये जस्ट डायलची सुरुवात केली.

मणी यांनी आपल्या कंपनीचा विस्तार करण्यास सुरूवात केली. कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेलशिवाय त्यांना ऑनलाइन फूड आणि तिकिट बुकिंगची सेवाही सुरू केली. कंपनीचं काम आणि नफा दोन्ही वाढत गेला. २००० मध्ये Just Dialचं डॉट कॉम व्हर्जन आणि २००७ मध्ये Just Dial चं वेब बेस्ड व्हर्जन लाँच करण्यात आलं.

२००७ पर्यंत कंपनीचं व्हॅल्युएशन ४ हजार कोटी रुपयांच्या जवळ गेलं. २०१३ मध्ये कंपनीनं आपला आयपीओ लाँच केला. कंपनीचं व्हॅल्युएशन ६ हजार कोटींपर्यंत गेलं. रिलायन्सला त्यांचा कॉन्सेप्ट आवडला आणि म्हणून २०२१ मध्ये त्यांनी जस्ट डायलचं अधिग्रहण केलं. रिलायन्स रिटेलनं ३४९७ कोटी रूपयांमध्ये जस्ट डायलचं अधिग्रहण केलं. यामध्ये त्यांना कंपनीची ४१ टक्के भागीदारी मिळाली.