घरोघरी जाऊन पंखे-शिलाई मशीन विकणाऱ्या १०वी पास मुलाने उभारले ₹८००० कोटींचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:59 IST2025-08-11T14:39:48+5:302025-08-11T14:59:42+5:30

Who is Vijay Sales Boss Nanu Gupta: खिशात फक्त २ हजार रुपये घेऊन मुंबई गाठली; भाड्याच्या दुकानातून सुरू केला व्यवसाय!

Vijay Sales Owner: हरियाणातील एका छोट्या गावातून मुंबईत आलेले नानू गुप्ता...खिशात फक्त २००० रुपये अन् हातात दहावी पासचे मार्कशीट. इंग्रजी येत नव्हती, व्यवसायाची जाण नव्हती. त्यांच्याकडे काही होते, तर हार न मानण्याचा दृढनिश्चय आणि काहीतरी मोठे करुन दाखवण्याची जिद्द! कधीकाळी सायकलवर लोकांच्या घरोघरी जाऊन पंखे आणि शिलाई मशीन विकणाऱ्या नानूंनी ८००० कोटी रुपयांची कंपनी उभारली. दहावी पास असलेला व्यक्ती आज १४० हून अधिक दुकानांचा मालक आहे.

हरियाणाच्या नानू गुप्तांचे कुटुंब शेती करायचे. मर्यादित उत्पन्न असल्याने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. फार कमी वयात समजले की, घराबाहेर पडून काम केल्याशिवाय पर्याय नाही. हा विचार मनात ठेवून दहावी उत्तीर्ण झालेले नानू गुप्ता १९५४ मध्ये २००० रुपये खिशात घेऊन मुंबईत आले. १९६७ मध्ये त्यांनी मुंबईतील माहीम परिसरात एक छोटे दुकान भाड्याने घेतले. ते सायकलवर गल्लोगल्ली शिलाई मशीन, रेडिओ, पंखे विकायचे.

नानू यांनी दुकानाचे नाव विजय सेल्स असे ठेवले. लोकांमध्ये दुकानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी ते स्वतः सायकलवरुन इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यासाठी जात असे. यातून त्यांनी फक्त विक्रीच केली नाही, तर लोकांशी चांगले संबंधही निर्माण केले. सायकलवर फिरुन ते लोकांचा विश्वास जिंकायचे अन् त्यांना आपल्या दुकानात यायला सांगायचे. १९७४ मध्ये त्यांनी त्यांच्या दुकानात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही विकायला सुरुवात केली. त्यानंतर रंगीत टीव्हीचे युग आले.

त्यांना समजले की, जर त्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी नवीन केले पाहिजे. टीव्ही योग्यरित्या प्रदर्शित करता याव्यात म्हणून त्यांनी दुकानासाठी मोठी जागा घेतली. त्यांनी ठरवले होते की, दुकानातील सर्व टीव्ही चालू ठेवावेत जेणेकरून ग्राहक आकर्षित होतील. त्यांची रणनीती कामी आली. हळूहळू त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला आणि त्या विश्वासाच्या आधारे त्यांनी त्या काळात ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याची सुविधा दिली. त्यावेळी ईएमआय प्रचलित नव्हता, परंतु नानू यांनी लोकांना हप्त्यांमध्ये पैसे देण्याची सुविधा दिली. हा निर्णय त्यांच्यासाठी ब्लॉकबस्टर ठरला.

नानूंची एकच रणनीती होती, ग्राहकांचा आनंद. जर एखाद्याला वस्तूंबाबत काही समस्या असेल, तर नानू स्वतः ग्राहकांच्या घरी पोहोचून समस्या सोडवत असे. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि सेवेने लोकांची मने जिंकली. त्यामुळे २००६-०७ पर्यंत त्यांनी विजय सेल्सचे १० हून अधिक शोरूम उघडले. पुणे, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली येथे स्टोअर्स उघडण्यात आले. सध्या देशभरात विजय सेल्सचे १४० हून अधिक शोरूम आहेत.

२००७ मध्ये विजय सेल्सने मोबाईल फोन आणि कॉम्प्युतर यासारख्या डिजिटल उत्पादनांनाही त्यांच्या दुकानात स्थान दिले. ९००० हून अधिक उत्पादने विजय सेल्सपर्यंत पोहोचली. नानू गुप्ता हे विजय सेल्सचे अध्यक्ष असून, त्यांची मुले नीलेश आणि आशिष संचालक आहेत. विजय सेल्सचे लक्ष्य २०२५ पर्यंत त्यांची विक्री ८००० ते १०,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आहे.

सध्या विजय सेल्समध्ये हजारो प्रकारची इलेक्ट्रॉनिक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांच्या यशाचा मूळ मंत्र विश्वास, प्रामाणिकपणा आणि ग्राहक सेवा आहे. नानू गुप्ता प्रगतीसाठी घाई करत नाहीत. संयम ठेवा, यश नक्की मिळेल, हा नानूंच्या यशाचा मंत्र आहे. आज विजय सेल्स दरवर्षी ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री करते. विजय सेल्सचे २०२५ पर्यंत ही विक्री दुप्पट करून ८,०००-१०,००० कोटी रुपये करण्याचे लक्ष्य आहे. कंपनीचा महसूल ११,००० कोटी रुपये आहे. तर, ८ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.