कुठे मिळेल जास्त परतावा? सोने, चांदी की म्युच्युअल फंड? जाणून घ्या तुमच्या खिशासाठी कोणती गुंतवणूक आहे सर्वात सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 07:21 IST2026-02-16T07:07:12+5:302026-02-16T07:21:41+5:30
सध्या सोन्या-चांदीचे कडाडलेले भाव आणि शेअर बाजारातील कमालीची अस्थिरता यामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे.

सध्या सोन्या-चांदीचे कडाडलेले भाव आणि शेअर बाजारातील कमालीची अस्थिरता यामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. गुंतवणुकीसाठी नेमका कोणता पर्याय निवडावा, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी पाच महत्त्वाचे कानमंत्र... गेल्या काही महिन्यांत विविध 'असेट क्लास'मध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे "माझ्याकडे ३० हजार रुपये आहेत, मी चांदी घेऊ की शेअर बाजारात जाऊ?" अशा प्रश्नांचा ओघ वाढला आहे. या अनिश्चिततेच्या काळात खालील पाच टिप्सचा विचार करा.

पाया पक्का करा : गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. मूलभूत गोष्टी न शिकता गुंतवणूक करणे म्हणजे श्वास घ्यायला न शिकता पाण्यात सूर मारण्यासारखे आहे.

इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट तयार करा : आपली कमाई, खर्च, गुंतवणूक, देणी आणि जोखीम घेण्याची क्षमता यांचा लेखी मसुदा तयार ठेवावा. स्वतः निर्णय घेण्याऐवजी एखाद्या विश्वासू आर्थिक सल्लागाराशी किंवा म्युच्युअल फंड वितरकाशी चर्चा करूनच पाऊल उचलावे.

घाईघाईत निर्णय नको : लगेच डायरेक्ट स्टॉक पोर्टफोलिओ बनवणे किंवा मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्याची घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत वाट पाहणे कधीही श्रेयस्कर ठरते. अनेक मार्गही त्यावेळी निघत जातात.

चुकांतून शिका : जर तुम्ही अजून गुंतवणूक सुरू केली नसेल तर आजच करा. चुका झाल्या असतील तर घाबरू नका; शांत राहून त्यातून धडा घ्या आणि पुढे जा.

इतरांसारखे करू नका : जर आपला शेजारी शेअरमध्ये गुंतवणूक करत असेल तर तुम्ही गुंतवणूक करून त्यात अडकू नका. त्यासाठी त्याचा जितका अभ्यास असेल तितका तुमचा असेलच असे नाही.

वर्ष २०२२- सोनं-५२६७० चांदी-५५१००, शेअर बाजार-५८३१० : वर्ष २०२३- सोनं-६५३३० चांदी-७८६००, शेअर बाजार-६०५५०

वर्ष २०२४- सोनं-७७९१३ चांदी-९५७००, शेअर बाजार-७१३८३ : वर्ष २०२५- सोनं-१,०५०० चांदी-२,६२,००० शेअर बाजार-७८६५७

वर्ष २०२६- सोनं-१६०९०० चांदी-२६८०००, शेअर बाजार-८३,६७५

















