दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 04:41 PM2023-04-09T16:41:34+5:302023-04-09T17:00:22+5:30

कर्नाटकात दुधावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अमूल आणि नंदिनी दुधाच्या वादाने राजकीय रंग घेतला आहे.

दुधावरून सुरू झालेल्या वादाने राजकीय रंग घेतला आहे. अमूलच्या एका घोषणेवरून सुरू झालेल्या वादाने मोठे रूप धारण केले आहे.

तामिळनाडूतील दही वादानंतर आता कर्नाटकातही दुधाचा वाद शिगेला पोहोचला आहे. दुधाचे दोन मोठे ब्रँड समोरासमोर आले आहेत. अमूल मिल्क आणि नंदिनी मिल्कवरून राजकारण तापले आहे.

अमूलने कर्नाटकात प्रवेश जाहीर केल्यावर हा वाद सुरू झाला. #GoBackAmul #savennandini या सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

५ एप्रिल रोजी अमूलने एक ट्विट केले होते. यात सांगितले होते अमूल बेंगळुरूमध्ये दूध आणि दही उत्पादनांचा पुरवठा करेल. या घोषणेनंतर काँग्रेसने भाजपला कर्नाटकचा ब्रँड नंदिनी नष्ट करायचा आहे, असा आरोप केला. काँग्रेसने याला कर्नाटक मिल्क फेडरेशनचा ब्रँड नंदिनी नष्ट करण्याचे षडयंत्र म्हटले होते.

यानंतर हा वाद आणखी वाढला. कर्नाटकात अमूलविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढू लागली. या वादात राजकीय पक्षही उतरले. राज्यातील शेतकऱ्यांनी निर्माण केलेला नंदिनी हा ब्रँड नष्ट करण्यासाठी भाजप हे सर्व करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राज्याचा स्वतःचा दुधाचा ब्रँड असताना गुजरातच्या दुग्धजन्य पदार्थांची गरजच काय, असा आरोप विरोधकांनी केला. तो सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आणि राज्यभर आंदोलने सुरू झाली. बॉयकॉट अमूल, गो बॅक अमूल असे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे.

विरोधकांच्या गदारोळानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, विरोधक विनाकारण या प्रकरणाला राजकीय रंग देत आहेत. ते म्हणाले की, नंदिनी व्यतिरिक्त राज्यात १८ वेगवेगळ्या ब्रँडचे दुग्धजन्य पदार्थ विकले जात होते, मात्र कोणाचेही नुकसान झाले नाही.

काँग्रेस जाणीवपूर्वक अमूलच्या नावावर राजकारण करत आहे. नंदिनीला देशातील नंबर वन ब्रँड बनवण्यासाठी अमूलपेक्षा अधिक स्पर्धात्मक बनवत आहेत, असंही बोम्मई म्हणाले.

कर्नाटकातील सर्वात मोठा दूध ब्रँड नंदिनी दररोज २३ लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा करते. एकटी नंदिनी बेंगळुरूच्या बाजारपेठेतील ७०% दुधाची गरज भागवते. अमूलच्या तुलनेत नंदिनीच्या दुधाच्या दरातही मोठी तफावत आहे. नंदिनी दुधाची एक लिटरची किंमत ३९ रुपये आहे, तर अमूल टोन्ड दुधाच्या लिटर पॅकेटची किंमत ५४ रुपये आहे.