UPI मध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे अडकली कोट्यवधी लोकांची पेमेंट्स, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:29 IST2025-03-27T14:23:23+5:302025-03-27T14:29:36+5:30
UPI Down: बुधवारी संध्याकाळी काही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण देशभरात यूपीआयचे व्यवहार बाधित झाले होते. त्यामुळे कोट्यवधी वापरकर्ते देवाणघेवाणीसाठी यूपीआयचा वापर करू शकले नाहीत. त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

गेल्या काही काळात देशातील छोट्यामोठ्या दैनंदिन व्यवहारामध्ये पैशांच्या देवाण घेवाणीसाठी यूपीआयचा वापर झपाट्याने वाढला आहे. अगदी किरकोळ रकमेपासून हजारो रुपयांपर्यंतचे व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून होतात. मात्र बुधवारी संध्याकाळी काही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण देशभरात यूपीआयचे व्यवहार बाधित झाले होते. त्यामुळे कोट्यवधी वापरकर्ते देवाणघेवाणीसाठी यूपीआयचा वापर करू शकले नाहीत.
दरम्यान, यूपीआयची देखभाल आणि व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआयमधील तांत्रिक बिघाडाची समस्या मान्य केली असून, या समस्येवर तोडगा काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
यूपीआय डाऊन झाल्यानंतर लाखो लोकांनी सोशल मीडियावरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. तसेच यूपीआय डाऊन झाल्याची तक्रार केली होती. त्यावर एनपीसीआयने उत्तर देताना यूपीआयमधील काही तांत्रिक समस्यांमुळे असं झाल्याचं सांगितलं. या समस्येचं निराकरण करण्यात आलं असून, आता यूपीआय व्यवस्थित काम करत असल्याचेही सांगण्यात आले. तांत्रिक समस्येमुळे अनेकदा वेबसाईट आणि ऑनलाईन सेवा ठप्प होते. यूपीआयसोबतही काहीसं असंच झालं होतं. मात्र ही समस्या काही वेळातच दुरुस्त करण्यात आली.
यूपीआय डाऊन झालं त्यादरम्यान, गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यासारखे लोकप्रिय यूपीआय अॅप्स ठप्प झाले होते. तर आयसीआयसीआय बँकेसारख्या काही बँका सामान्यपणे काम करत होत्या. तसेच एचडीएफसी बँकेसारख्या बँकांच्या व्यवहारांमध्ये काही अडथळे आले होते. त्यानंतर काही वापरकर्त्यांनी सेवेमधील समस्यांवर लक्ष ठेवणाऱ्या डाऊनडिटेक्टरवर आपल्या अयशस्वी व्यवहार आणि कनेक्टिव्हिटीमधील समस्यांबाबत तक्रार केली होती.
दरम्यान, अशी समस्या निर्माण झाल्यास बिघाड दुरुस्त होईपर्यंत वापरकर्त्यांनी नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा रोख रक्कम या पर्यायी पेमेंट्स मोड्सचा वापर करावा, असा सल्ला दिला जातो. तसेच अशी समस्या उदभवल्यावर व्यवाहारांचं स्टेटस दिसण्यास कधी कधी वेळ लागू शकतो. त्यामुळे ४८ तासांपर्यंत वाट पाहावी, असं आवाहनही यूपीआयकडून करण्यात येतं.