ईपीएस-९५ पेन्शनचे नेमके फायदे काय? सदस्याच्या मृत्यूनंतर काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 10:22 AM2023-01-26T10:22:39+5:302023-01-26T10:28:42+5:30

कर्मचारी पेन्शन योजना -१९९५ म्हणजेच ईपीएस-९५ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांची संख्या देशात सुमारे ७५ लाख आहे.

यासोबतच ६ कोटींहून अधिक भागधारकांचाही यात समावेश आहे. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारे चालवली जाते. यात नेमके काय फायदे मिळतात, ते जाणून घेऊ...

वयाच्या ५८ व्या वर्षांनंतर सदस्याला सेवानिवृत्ती पेन्शन. सदस्याला वयाच्या ५० व्या वर्षांपासून लवकर सदस्य पेन्शन मिळते. (फक्त बेरोजगार असेल तर)

सदस्याला काम करत असताना कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास अपंगत्व पेन्शन मिळते. सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा नवऱ्याला पेन्शन मिळते. सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या पहिल्या दोन मुलांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत अपत्य पेन्शन मिळते.

सदस्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या जोडीदाराचा मृत्यू होतो किंवा जोडीदार नसतो, तेव्हा त्यांच्या दोन अनाथ अपत्यांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत अनाथ पेन्शन मिळते. अपंगत्व असलेले मूल किंवा अनाथ यांना संपूर्ण जीवनभर अपंगत्व पेन्शन किंवा अनाथ पेन्शन मिळते

मृत्यूनंतर कुटुंब नसल्यास, सदस्याने नॉमिनी केलेल्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते. सदस्याचे कुटुंब नसेल तर, मृत्यूनंतर वडिलांना किंवा आईला पेन्शन मिळते.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ईपीएफओचा सदस्य असणे आवश्यक आहे. कोणत्याही ईपीएफओ सदस्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला ईपीएफ खात्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाते. या योजनेअंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान १० वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल. या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे.