पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:05 AM2024-05-27T00:05:05+5:302024-05-27T00:06:55+5:30

दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.

How much lead will BJP get from Pune bjp Muralidhar Mohol told the figure   | पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

Pune Lok Sabha ( Marathi News ) : पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा रंगतदार लढत झाली आहे. कारण भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. अशातच मतमोजणीला अवघे काही दिवस बाकी असताना मुरलीधर मोहोळ यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत मताधिक्याविषयीदेखील भाष्य केलं आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुणे लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. कारण लोकांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केलं आहे. मला सर्वाधिक मताधिक्य कोथरूड विधानसभेतून मिळेल. पण कसब्यातूनही मला मताधिक्य मिळेल, हे मी नक्कीच सांगू शकतो. पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये मला मताधिक्य असेल आणि ४ जूनला हे स्पष्टच होईल," असं मोहोळ यांनी म्हटलं. तसंच एकूण किती मतांनी विजय होईल, या प्रश्नावर बोलताना मोहोळ यांनी म्हटलं की, "गिरीश बापटसाहेब यांना जेवढं मताधिक्य मिळालं होतं, तेवढंच मताधिक्य मला पुणेकर देणार आहेत."

दरम्यान, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुण्याच्या लढतीत नक्की कोण विजयाचा गुलाल उधळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुण्यातील राजकीय स्थिती, काय होती प्रचारादरम्यानची स्थिती?

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत लोकसभेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा फोकस जानेवारीपासूनच पुण्यावर होता. त्यामुळे भाजपने तगडा मराठा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. त्यानंतर अंतर्गत गटबाजीच्या चर्चाही काही काळ रंगल्या. हेच काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही घडले. कसब्याच्या विजयानंतर चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकरांना महाआघाडीने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर  झाल्यानंतर लगेच पक्षांतर्गत कलह समोर आला. 
 
थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतर्गत गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे अटीतटीची होणार आहे. सामना कोण जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: How much lead will BJP get from Pune bjp Muralidhar Mohol told the figure  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.