केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

By नरेश डोंगरे | Published: May 26, 2024 11:38 PM2024-05-26T23:38:30+5:302024-05-26T23:38:45+5:30

सामन्यापूर्वीच दिले होते 'कोलकाता विन'चे संकेत

KKR bowlers poured crores of money into bookies' coffers | केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

नागपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये केकेआरच्या बॉलर्सनी एकीकडे हैदराबादच्या चमूला पळता भूई थोडी केली. दुसरीकडे नागपूरसह मध्य भारतातील बुकींच्याही तिजोऱ्यांमध्ये १० ते १५ हजार कोटींची गंगाजळी ओतली. ओपनिंगला ९५-९८ असा भाव देऊन बुकींनी फायनलची ट्रॉफी कोलकाता नाईट रायडरच जिंकेल, असे संकेत दिले होते, हे विशेष !

आयपीएलच नव्हे तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हजारो कोटींची कटिंग करणारे बुकी नागपुरात बसले असल्यामुळे देशातील बुकीबाजारात नागपूरचे नाव अव्वलस्थानी येते. येथील बुकींचे नेटवर्क थेट दुबईत आहे. त्यामुळे देश-विदेशातील बडे बुकी नागपूरच्या बुकींच्या लाईनवर कनेक्ट असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये ७० लिग मॅॅच खेळवण्यात आल्या. तीन क्वॉर्टरफायनल आणि शेवटची आज झालेली फायनल अशा एकूण ७४ मॅचेस यावेळीच्या आयपीएलमध्ये झाल्या. या सर्व सामन्यांवर नागपूरच्या बुकींनी खास नजर ठेवली होती. कुणी गोव्यातून, कुणी थेट दुबईत बसूनही कटिंग चालविली होती. त्यांनी कधी जित तर कधी हारही पत्करली. मात्र, आजच्या फायनलने अपवाद वगळता सर्वच्या सर्व बुकींचे नशिब फळफळवले.

देश-विदेशातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या साक्षीने आजचा फायनलचा सामना सुरू झाला तेव्हा बुकींनी कोलकाता संघाच्या विजयाला ९५ (१ हजार लावले तर ९५० रुपये मिळतील) असा भाव दिला होता. तर, सनराईजर्स हैदराबादच्या संघाला ९८ (९८० रुपये लावले तर एक हजार रुपये मिळेल) असा भाव दिला होता. अर्थात कोलकाताचे पारडे जड दाखविले असले तरी सामना तुल्यबळ होईल, असेही संकेत दिले होते. त्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच वेगवेगळ्या लाईनची वेगवेगळी लगवाडीही सटोड्यांनी केली होती. मात्र, कोलकाताच्या बॉलर्सनी हैदराबादच्या फलंदाजांची दाणादाण उडवून त्यांना केवळ ११३ रणमध्येच निपटवले. सामन्याच्या उत्तरार्धात बुकींचे हाैसले कोलकाता संघासारखेच बुलंद झाले. त्यांनी शेवटच्या टप्प्यात कोलकाताला-हैदराबादला क्रमश: केवळ ४-५ पैसे भाव दिला. अर्थात कोलकाताच्या विजयावर एक हजार लावाल तर जिंकल्यानंतर केवळ ४० रुपये मिळतील आणि हैदराबादवर ५० रुपये लावाल तर जिंकल्यानंतर १ हजार रुपये मिळतील, असा टोकाचा भाव दिला होता. शेवटी कोलकाताने अंतिम सामना जिंकून संकेतानुसार बुकींच्या खिशात कोट्यवधींची गंगाजळी ओतली.
 
सर्वच बुकींची दिवाळी
आजच्या सामन्यावर नागपूर-मध्य भारतातील एखाद-दुसऱ्या बुकीचा अपवाद वगळता सर्वच बुकी कोट्यवधींनी फायद्यात राहिले आहे. आजच्या एकट्या फायनल मॅचवर नागपुरातून संचालित होणाऱ्या सट्टा बाजारात एकूण लगवाडी-खयवाडी १० ते १५ हजार करोडच्यावर होती, असेही बुकीबाजारातील सूत्रांचे सांगणे आहे. ९९ टक्के बुकींनी कोट्यवधी जिंकल्याने सर्वच बुकींच्या घरी पुढचे काही दिवस दिवाळीचा माहाैल राहणार असल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे.

Web Title: KKR bowlers poured crores of money into bookies' coffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.