मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:35 PM2024-05-26T22:35:00+5:302024-05-26T22:36:31+5:30

मतमोजणीला अवघे काही दिवस बाकी असताना सोनवणे यांनी आयोगाला आणखी एक पत्र लिहिलं आहे.

Keep some officials away from Beed during counting ncp sp Bajrang Sonawane demand to Election Commission | मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

Beed Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात ज्या काही मोजक्या लोकसभा मतदारसंघांची जोरदार चर्चा झाली त्यामध्ये बीड लोकसभेचाही समावेश आहे. या मतदारसंघात भाजपने यंदा विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीच्या प्रचारकाळात या दोन्ही उमेदवारांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र हे वादंग मतदानानंतरही कायम राहिल्याचं चित्र आहे. कारण मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक गावांमध्ये बूथ हायजॅक करून बोगस मतदान करण्यात आल्याची तक्रार बजरंग सोनवणे यांनी केली होती. त्यानंतर आता मतमोजणीला अवघे काही दिवस बाकी असताना सोनवणे यांनी आयोगाला आणखी एक पत्र लिहीत मतमोजणीच्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील पक्षपात करणाऱ्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना या प्रक्रियेत सामील करून घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे की, "बीड जिल्ह्यातील काही अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत राहिले तर ते काहीही करू शकतात. निकालही उलटा-सुलटा करू शकतात. त्यांना कोणताही वचक राहिलेला नाही. ते सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मतमोजणीपासून दूर ठेवावं, अशी मागणी करणारं पत्र मी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे," अशी माहिती सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान, विरोधकांकडून हा रडीचा डाव खेळला जात असल्याचा पलटवार भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सोनवणे यांनी मतदानाबाबत काय आरोप केला होता?

बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत. बजरंग सोनवणे यांनी काही गावांची यादी देऊन तेथे असे प्रकार घडल्याचे म्हटले होते.  या संबंधीचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेले होते. या व्हिडीओंची तसेच सोनवणेंच्या तक्रारीची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालातील काही मुद्द्यांवर आणखी स्पष्ट माहिती द्या, असे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानावेळी गडबडी झाल्याच्या तक्रारी आहेत, तशा तक्रारी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून आलेल्या नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले. 

मतदारसंघातील कसं आहे राजकीय गणित?

पंकजा मुंडे यांच्या जमेच्या बाजू : ओबीसी नेत्या म्हणून ओळख. जिल्ह्यात एका विद्यमान खासदारांसह सहा आमदारांचे पाठबळ. जिल्ह्यात भाजपची ताकद. त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) सोबत आल्याने आणखी बळ मिळाले आहे. वंजारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी. सक्षम यंत्रणा.
- उणे बाजू : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या सक्रिय नव्हत्या. जिल्ह्यात संपर्क कमी. मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर येत नाहीत. पक्षांतर्गत नेत्यांचाही विरोध. कारखाना डबघाईला आल्याने अडचणीत.

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- जमेच्या बाजू : येडेश्वरी कारखान्यामुळे शेतकरी सोबत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचाही अनुभव. मराठा कार्ड आणि शेतकरीपुत्र म्हणून मैदानात उतरल्याने सहानुभूती मिळू शकते.
- उणे बाजू : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर ते गायब होते. जिल्ह्यात केवळ एक खासदार आणि एक आमदार सोबत. मॅनेजमेंटसाठी यंत्रणा अपुरी.

Web Title: Keep some officials away from Beed during counting ncp sp Bajrang Sonawane demand to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.