माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 09:20 IST2025-07-10T09:01:47+5:302025-07-10T09:20:55+5:30
जेन स्ट्रीटनं २०२४ मध्येच २५,००० कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि केतन पारेख यांसारख्या बड्या भारतीय घोटाळेबाजांच्या एकत्रित फसवणुकीपेक्षा जास्त आहे, असा दावा एकानं केलाय.

व्हिसलब्लोअर मयंक बन्सल यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या मते, जागतिक ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटनं भारतीय शेअर बाजारात विशेषत: ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक्सपायरी डे ट्रेडिंगमध्ये फेरफार करून प्रचंड नफा कमावला आहे. बन्सल युएईमधील एका हेज फंडाचे प्रमुख आहेत. त्यांनीच सर्वप्रथम बाजार नियामक सेबीला या प्रकरणाची माहिती दिली.

जेन स्ट्रीटनं २०२४ मध्येच २५,००० कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि केतन पारेख यांसारख्या बड्या भारतीय घोटाळेबाजांच्या एकत्रित फसवणुकीपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.

सेबीला केवळ २१ दिवसांत मिळालेले ४,८०० कोटी रुपये ही थोडीशीच रक्कम असल्याचं बन्सल यांनी निदर्शनास आणून दिलं. जुलै २०२३ पासून सुरू होणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीत जेन स्ट्रीटचा एकूण नफा २६,५०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यातील जवळजवळ संपूर्ण भाग 'बेकायदेशीरपणे' मिळवण्यात करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

३ जुलै रोजी सेबीनं जेन स्ट्रीटवर कारवाई करत भारतात व्यवसाय करण्यास बंदी घातली होती. तसंच ४,८४४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. जेन स्ट्रीटनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. ती 'बेसिक आर्बिट्राज' करत होती, असं सांगण्यात आलं आहे.

बन्सल यांनी बीटी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जेन स्ट्रीटच्या हेराफेरीबद्दलही सविस्तर भाष्य केलं. ती दोन टप्प्यांत पार पडली. सुरुवातीला ही कंपनी मूळ निर्देशांकावर प्रभाव टाकण्यासाठी रोख आणि फ्युचर्समध्ये मोठी पोझिशन घेत होती. मग, एक्सपायरी दिवसांमध्ये, त्यानं आपल्या अंडरलाईंगला डेरिव्हेटिव्ह पोझिशन्सच्या नफ्याशी सुसंगत करण्यासाठी फेरफार केल्याचं ते म्हणाले.

एकदा निर्देशांक कृत्रिमरित्या फुगवल्यानंतर, जेन स्ट्रीट शॉर्ट ऑप्शन पोझिशन स्थापित करत होता. म्हणजे 'लाँग पुट आणि शॉर्ट कॉल'. त्यानंतर तिनं आपली कॅश होल्डिंग्स विकली. या धोरणांमुळे सुमारे ७,००० कोटी रुपयांचे कॅश/फ्युचर्सचं जाणीवपूर्वक नुकसान झालं. मात्र, ऑप्शन्समधून मिळालेल्या मोठ्या नफ्यामुळे हा तोटा सहज भरून निघाला. बँक निफ्टी, निफ्टी, सेन्सेक्स आणि मिडकॅपसह अनेक निर्देशांकांमध्ये प्रत्येक एक्सपायरी डेवर हा फेरफार झाल्याचं त्यांनी सांगितलं.

जेन स्ट्रीटच्या नफ्याची तुलना त्याच्या स्पर्धकांच्या नफ्याशी केली तर या फेरफारचं प्रमाण स्पष्ट होते. बन्सल म्हणाले की, २०२४ मध्ये जेन स्ट्रीटचा ३ अब्ज रुपये (३०० कोटी रुपये) नफा त्याच्या जवळच्या स्पर्धकाच्या ३२०-३६० मिलियन रुपये (३२-३६ कोटी रुपये) कमाईपेक्षा नऊ पट जास्त होता. हा फरक इतका मोठा होता की तो दुर्लक्षित करता येणार नाही.


















