आधी बाबा रामदेव यांच्या औषधांवर आणली बंदी, आता म्हटलं चूक झाली; ३ दिवसांत बंदी हटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 09:20 AM2022-11-13T09:20:46+5:302022-11-13T09:30:30+5:30

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले होते.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले होते. दिव्य फार्मसीमार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत असा दावा करून या प्राधिकरणाने म्हटले होते की, या औषधांच्या उत्पादनासाठी दिव्या फार्मसीने पुन्हा परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, आता उत्तराखंड सरकारनं लावली बंदी तीनच दिवसांत मागे घेण्यात आली आहे.

उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने शनिवारी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली. दिव्य फार्मसीचा दावा आहे की ही औषधे रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्ट्रॉलवर उपचार करू शकतात. आम्ही पूर्वीचा आदेश घाईघाईने जारी केला होता आणि ही चूक होती, असं स्पष्टीकरण उत्तराखंड औषध नियामकाने या प्रकरणी दिलं.

'आम्ही या संचालनालयाने जारी केलेल्या 9 नोव्हेंबरच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करून औषधांचे (पाच उत्पादने) उत्पादन पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यास परवानगी देत आहोत,’ असं आता उत्तराखंडचे औषध नियामक डॉ. जीसीएन जंगपांगी यांनी शनिवारी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“आम्ही पूर्वीचा आदेश घाईघाईने जारी केला होता आणि ती एक चूक होती. आम्ही दिव्या फार्मसीला नवीन आदेश जारी करून पाच औषधांचे (उत्पादने) उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. उत्पादनावर बंदी घालण्याचा आदेश देण्यापूर्वी आम्ही कंपनीला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ द्यायला हवा होता," जंगपांगी यांनी एचटीला सांगितले.

"आयुर्वेदाची बदनामी करण्याच्या या अतार्किक कृतीची दखल घेतल्याबद्दल आणि वेळेवर त्रुटी सुधारल्याबद्दल आम्ही उत्तराखंड सरकारचे नम्रपणे आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया बंदी उठवण्याच्या आदेशानंतर पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारीवाला यांनी दिली.

"दुर्दैवाने, उत्तराखंडच्या आयुर्वेद परवाना प्राधिकरणाचे काही अज्ञानी, असंवेदनशील आणि अयोग्य अधिकारी आयुर्वेदाच्या संपूर्ण ऋषी परंपरेला कलंकित करत आहेत. एका अधिकाऱ्याची ही अविवेकी चूक, (जी) परंपरा आणि प्रामाणिक संशोधनावर प्रश्नचिन्ह आहे. पतंजलीची बदनामी करण्यासाठी जाणूनबुजून निंदनीय कृत्य करण्यात आले आहे,” असंही पतंजलीनं एका निवेदनात म्हटलंय.