पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

By हेमंत बावकर | Updated: July 21, 2025 09:17 IST2025-07-21T09:10:20+5:302025-07-21T09:17:20+5:30

Reliance, Brands Business Idea: ही दुकाने चालतात की नाही, त्यांचा खर्च निघतो की नाही हे त्यांनाच माहिती. परंतू, यात काही ब्रँड फसतातही.

उद्योगधंदा करताना अनेक गोष्टी तो उद्योग किंवा ते दुकान चालणार की नाही ते ठरवितात. आता तुम्ही शहरांचेच नाही तर छोट्या छोट्या शहरी भागातील म्हणाल तर एका दुकानाच्या बाजुला दुसरे तोच माल विकणारे दुकान टाकलेले सर्रास दिसते. कपड्यांची दुकाने एका बाजुला एका, चपलांची दुकाने तशीच... पण त्यांचे मालक वेगवेगळे असतात. परंतू पुण्यात एकाच ब्रँडची शेजारी शेजारी दोन दोन इमारतींत दालने उघडण्यात आली आहेत. यामध्ये रिलायन्स टेन्ड्स, पँटालून्स आणि लेन्सकार्ट सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

पूर्वी असा समज होता की चौकात एक मेडिकल असेल तर दुसरे टाकले तर ते चालणार नाही. एक कपड्याचे दुकान असेल तर त्याच भागात दुसरे आले तर चालणार नाही. तो काळ वेगळा होता. तेव्हा चंगळवाद नव्हता. यामुळे लोक एकदा घेतलेले कपडे किंवा वस्तू कित्येक महिने, वर्षे पुरवून पुरवून वापरत होते. आता तसे नाही, सकाळी एक, सायंकाळी एक असे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालण्याची आता वृत्ती वाढू लागली आहे. तरुणाईच्या हाती पैसा खुळखुळू लागल्याने खर्चही वाढला आहे. नेमका याचाच फायदा मोठमोठे ब्रँड घेत आहेत.

या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकच ब्रँड आपल्याच दालनाशेजारील इमारतीत किंवा अगदी जवळ दुसरे दालन उघडून बसत आहे. आता या दालनातील कर्मचारी, लाईट आणि त्याचे भाडे हा खर्च पेलवतो की नाही हे त्याच्या खपावर अवलंबून असले तरी कंपन्या ही क्लुप्ती वापरत आहेत. औंधमध्ये मॉलमध्ये एक रिलायन्स ट्रेन्ड्स आहे, तर त्याच्या बाजुच्याच रिलायन्स मॉलमध्येही आहे. औंधच्या याच मॉलमध्ये लेन्सकार्ट आहे, तर दोन इमारती सोडून डीमार्टच्या दिशेनेही लेन्सकार्ट आहे. एवढेच नाही तर या लेन्सकार्टच्या बाजुलाच टायटन सारख्या ब्रँडनी आपली चष्म्याची दुकाने थाटली आहेत.

ही दुकाने चालतात की नाही, त्यांचा खर्च निघतो की नाही हे त्यांनाच माहिती. परंतू, यात काही ब्रँड फसतातही. असा प्रकार पुण्यातच पॅन्टालून्सबाबत घडला आहे. सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलिअन मॉलमध्ये पॅन्टालून्स आहे, त्याच्या पलिकडच्या चौकात म्हणजेच जेडब्ल्यू मॅरियॉटच्या समोरच्या इमारतीत भले मोठे पॅन्टालून्सने दालन होते, ते चालत नसल्याने आता बंद आहे. कंपन्यांच्या अशाप्रकारच्या रणनीतिमागे कारण काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एकाच ब्रँडचे व्यवसाय जाणूनबुजून क्लस्टर इफेक्ट तयार करण्यासाठी शेजारील ठिकाणे निवडू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची उत्पादने किंवा सेवा शोधणे सोपे जाते. जेणेकरून ग्राहकाला आकर्षित करता येते.

ग्राहकांना एकाच ब्रँडच्या वेगवेगळ्या शाखांमधील किंवा प्रतिस्पर्धी ब्रँडमधील उत्पादने किंवा सेवांची तुलना करणे सोपे होऊ शकते.

दोन्ही दालनांमध्ये एकसारखेच कपडे किंवा वस्तू यांची संख्या कमी असते, एका ठिकाणी तुमच्या पसंतीचे, साईजची वस्तू सापडली तरी नाही दुसऱ्या ठिकाणी ती आहे का पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, यामुळे या दोन्ही दालनांचा सेल वाढतो.

एकाच भागात एकापेक्षा जास्त स्टोअर असल्यास तुमचा ब्रँड लोकांच्या नजरेत भरतो, यामुळे विक्रीत वाढ होते. तसेच दुसऱ्या ब्रँडकडे जाण्याचा लोकांचा कल कमी होतो.