लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन

By जयदीप दाभोळकर | Updated: August 22, 2025 09:32 IST2025-08-22T09:21:42+5:302025-08-22T09:32:17+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या स्कीममध्ये तुम्ही २२२ रुपये जमा करुन ११ लाखांचा निधी उभा करू शकता.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. यातील एक खास योजन म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी, ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त २२२ रुपये वाचवून ११ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. ही योजना सरकारच्या हमीसह येते, म्हणजेच तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत, तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करता. जर तुम्ही दररोज २२२ रुपये वाचवले तर ते एका महिन्यात ६,६६० रुपये होतात. यानुसार, ५ वर्षांत तुम्ही एकूण ३,९९,६०० रुपये जमा कराल. या रकमेवर तुम्हाला ६.७% वार्षिक व्याज मिळतं, ज्यात दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या व्याजावरही व्याज मिळतं.

अशातच तुम्हाला ५ वर्षांनंतर तुम्हाला ४,७५,२९७ रुपये मिळतात. आता जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी ५ वर्षांसाठी म्हणजेच एकूण १० वर्षांसाठी वाढवली तर तुमची गुंतवणूक ७,९९,२०० रुपये होईल आणि एकूण रक्कम ११,३७,८९१ रुपये होईल. अशा प्रकारे, १० वर्षांनंतर तुम्हाला ११ लाख रुपये मिळतील. दररोज फक्त २२२ रुपयांची बचत करून इतका मोठा निधी तयार करता येतो!

या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला ती सुरू करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. तुम्ही दरमहा फक्त १०० रुपयांपासून सुरुवात करू शकता. ही योजना सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली आहे, मग तुम्ही तरुण असोत, वृद्ध असोत किंवा मुलांसाठी खातं उघडत असाल.

तुम्ही एकटे किंवा संयुक्तपणे खातं उघडू शकता. जर तुम्हाला या दरम्यान पैशांची आवश्यकता असेल तर ३ वर्षांनी खातं बंद करण्याचा पर्याय देखील आहे.

तसंच, जर तुम्ही १ वर्ष सतत पैसे जमा केले असतील, तर तुम्ही तुमच्या ठेवीच्या ५०% पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता. या कर्जावर फक्त २% अतिरिक्त व्याज द्यावं लागेल, जे तुमच्या गरजेच्या वेळी एक मोठा आधार ठरू शकतं.

या योजनेत नॉमिनीची सुविधा देखील आहे. जर गुंतवणूकदाराला काही झालं तर, नॉमिनी खात्यावर दावा करू शकतो किंवा ते पुढे नेऊ शकतो. योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतु तुम्ही तो आणखी ५ वर्षांनी वाढवू शकता.

लक्षात ठेवा की तुम्हाला दरमहा वेळेवर रक्कम जमा करावी लागेल, अन्यथा दरमहा १% दंड आकारला जाऊ शकतो. जर सलग ४ हप्ते चुकले तर खातं बंद देखील होऊ शकते. ही योजना लहान बचत मोठ्या निधीत रूपांतरित करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.