Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:00 IST2026-01-12T08:48:34+5:302026-01-12T09:00:30+5:30
Cheapest Home Loan Govt Banks: दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची गरज भासते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये केलेल्या मोठ्या कपातीनंतर, आता देशातील होम लोनचे व्याजदर लक्षणीयरीत्या कमी झालेत.

Cheapest Home Loan Govt Banks: दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची गरज भासते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये केलेल्या मोठ्या कपातीनंतर, आता देशातील होम लोनचे व्याजदर लक्षणीयरीत्या कमी झालेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केली होती, त्यानंतर सरकारी बँकांनी होम लोनचे सुरुवातीचे व्याजदर ७.१० टक्क्यांपर्यंत खाली आणले.

सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत अनेक सरकारी बँकांचा समावेश आहे. सरकारी बँकांव्यतिरिक्त, काही हाऊसिंग फायनान्स कंपन्या देखील आपल्या ग्राहकांना ७.१५ टक्क्यांच्या किमान दरानं होम लोन उपलब्ध करून देत आहेत.

सर्वात स्वस्त होम लोन देण्याच्या बाबतीत खाजगी बँका थोड्या मागे आहेत. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक यांसारख्या मोठ्या खाजगी बँका या यादीत बऱ्याच मागे असून त्या किमान ७.६५ टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं कर्ज देत आहेत.

एचडीएफसी बँक ७.९० टक्के, आयसीआयसीआय बँक ७.६५ टक्के आणि ॲक्सिस बँक ८.३५ टक्के सुरुवातीच्या दराने होम लोन ऑफर करत आहेत. येथे आपण सर्वात स्वस्त होम लोन देणाऱ्या टॉप ५ बँकांबाबत जाणून घेऊया:

१. बँक ऑफ इंडिया (Bank of India)
Paisabazaar.com नुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ७.१० टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोन ऑफर करत आहे. ही सरकारी बँक ३० लाख ते ७५ लाख रुपयांपर्यंतचे होम लोन ७.१०-१०.०० टक्के आणि ७५ लाख रुपयांच्या पुढील कर्ज ७.१०-१०.२५ टक्के व्याजदरानं देत आहे.

२. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील एक सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना ३० लाख रुपयांपासून ते ७५ लाख रुपयांच्या पुढील सर्व गृहकर्जांवर ७.१०-९.९० टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

३. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक आपल्या ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदरानं होम लोन उपलब्ध करून देत आहे.

४. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देखील एक सरकारी बँक आहे. ही बँक ३० लाख रुपयांपासून ते ७५ लाख रुपयांच्या पुढील सर्व गृहकर्ज ७.१०-९.१५ टक्क्यांच्या व्याजदरानं देत आहे.

५. यूको बँक (UCO Bank)
सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँक आपल्या ग्राहकांना ३० लाख रुपयांपासून ते ७५ लाख रुपयांच्या पुढील सर्व गृहकर्ज ७.१५-९.२५ टक्क्यांच्या व्याजदरानं उपलब्ध करून देत आहे.

















