अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:29 AM2021-08-07T09:29:38+5:302021-08-07T09:34:20+5:30

Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत असून, ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर, काही बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jio ला जोरदार टक्कर देण्यासाठी Vodafone आणि Idea यांनी एकत्र येत Vi या संयुक्त कंपनीची स्थापना केली. मात्र, आर्थिक आघाडी सावरण्यास कंपनीला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या आणि व्यवसाय गुंडाळण्याची तयारी Vi करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर यामुळे Vi ची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, Vi वर सध्या १.८ लाख कोटींचे कर्ज आहे. कंपनीने ५८ हजार २५४ कोटींचा एजीआरही थकवला आहे. या थकीत रकमेपैकी आतापर्यंत Vi ने केवळ ७ हजार ८५४ कोटी रुपये भरले आहेत.

Vi चे हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी कंपनीचे मुख्य प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःची २७ टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. हिस्सा विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांचा तडकाफडकी राजीनामा आणि पालक कंपनी व्होडाफोनने नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिल्याने Vi चे भवितव्य डळमळीत बनले आहे. याचे पडसाद शेअर मार्केटवरही उमटल्यामुळे आतापर्यंत कंपनीचे बाजार भांडवल २,७०० कोटी घसरले आहे.

थकबाकीचा डोंगर एका बाजून वाढत असतानाच दुसरीकडे Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत आहे. ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर मात्र दोन खासगी बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Vi ने आयडीएफसी फर्स्ट बँकेतूनही मोठे कर्ज उचलले आहे. कंपनीने विविध बँकांतून गेतलेल्या कर्जांमध्ये या बँकेतून घेतलेल्या कर्जाचे प्रमाण २.९ टक्के आहे. यानंतर येस बँकेचा कर्जहिस्सा एकूण कर्जामध्ये २.४ टक्के, तर इंडसइंड बँकेचा हिस्सा १.६५ टक्के आहे.

Vi संकटाचा याचा दबाव बँकांच्या समभागांवर गुरुवारी स्पष्ट दिसून आला. स्टेट बँकेचा समभाग ३.२८ टक्के पडून ४४१.९५ रुपये किंमतीवर बंद झाला. येस बँकेचा समभाग १.५८ टक्के खाली येत १२.४५ रुपयांवर बंद झाला. तर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचा समभाग ४ टक्के घसरत ४७.७५ रुपयांवर स्थिरावला.

Vi ने स्टेट बँकेकडून तब्बल ११ हजार कोटींचे कर्ज घेतले असून, येस बँकेकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. तसेच इंडसइंड बँकेकडून ३ हजार ५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. Vi अखेरच्या घटका मोजत असल्याची वृत्त बाजारात येताच या तीन बँकांचे टेन्शन वाढले असून, कंपनी बंद झाली, तर या बँकांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, एजीआरची मोजदाद कशी करायची यावरून सरकार आणि दूरसंचार कंपन्यांत मतभेद झाले होते. त्यावरून कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

तसेच आपल्याला २७ कोटी भारतीय ग्राहकांची चिंता आहे. त्यामुळे माझ्या वाट्याचा २७ टक्के हिस्सा आपण विक्री करण्यास तयार आहोत, असे सांगत कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.

Vi लिमिटेडने सांगितले की, कुमाल मंगलम बिर्ला यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आला असून, आदित्य बिर्ला समूहाकडून हिमांशु कपाडिया यांची बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.