टाटा सन्सची स्मार्ट खेळी! TCS ‘बायबॅक’मधून ११,१६४ कोटींचा धनलाभ; LIC ने ५२८ कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:57 AM2022-03-30T11:57:17+5:302022-03-30T12:23:32+5:30

TCS च्या शेअर बायबॅक योजनेचा सर्वाधिक लाभ तिची सर्वांत मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला झाला आहे. पाहा, डिटेल्स...

TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये कमाल कामगिरी करताना दिसत आहेत. टाटा ग्रुपच्या अनेकविध कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी म्हणजे TCS. या कंपनीने अलीकडेच शेअर बायबॅक ऑफर आणली होती. गुंतवणूकदारांकडून याला तुफान प्रतिसाद मिळाला.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टाटा समूहातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (TCS) ९ मार्च ते २३ मार्च दरम्यान केलेल्या १८,००० कोटींच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वांत मोठी भागधारक असलेल्या Tata Sons ला झाला आहे.

TCS च्या ‘बायबॅक’ योजनेत टाटा सन्सने टाटा सन्सने २.४८ कोटी समभाग देऊन ११,१६४ कोटी रुपये मिळविले आहेत. टाटा सन्स पाठोपाठ भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ‘बायबॅक’मध्ये सहभागी होत ११.७ लाख समभाग देऊन ५२८ कोटी रुपये कमविले आहेत.

TCS च्या बायबॅक योजनेला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. कंपनीकडून पुनर्खरेदी योजनेंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांकडून ६० लाख समभाग घेण्यात येणार होते. प्रत्यक्षात अशा गुंतवणूकदारांनी २.५३ कोटी समभागांची म्हणजेच ४.२२ पट अधिक नोंदणी केली होती.

लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह ‘बायबॅक’चा मार्ग अनुसरला आहे.

प्रवर्तकच कंपनीतील मोठा भागधारक असल्याने, त्याला या माध्यमातून सर्वाधिक करमुक्त लाभ मिळविता येतो. समभाग पुनर्खरेदीनंतर, TCS मधील टाटा सन्सची मालकी ७२.१९ टक्क्यांवरून ७२.३० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर सार्वजनिक हिस्सा २७.८१ टक्क्यांवरून कमी होत २७.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

TCS ने गत सहा वर्षांत चौथ्यांदा समभाग पुनर्खरेदी योजना आणली असून, त्यायोगे एकंदर ६६,००० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.

गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान TCS ने जाहीर केलेल्या १६,००० कोटी रुपयांच्या ‘बायबॅक’ योजनेत सहभागी होऊन टाटा सन्सने ९,९९७.५ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले होते.

तर त्याआधी TCS ने १८ मे ते ३१ मे २०१७ दरम्यान केलेल्या समभाग पुनर्खरेदीत टाटा सन्सने १०,२७८ कोटी रुपयांचा धनलाभ मिळविला होता.