Tata Air India Take Over: टाटा समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 07:24 PM2022-01-27T19:24:02+5:302022-01-27T19:31:12+5:30

अखेर तो दिवस आलाच! एअर इंडिया पुन्हा टाटांची झाली

टाटा समुहाकडे (TATA Group) एअर इंडियाचे (Air India) अधिकृत हस्तांतरण करण्यापूर्वी, टाटा सन्सचे (Tata Sons) अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदी आणि टाटा चेअरमन यांच्यातील भेटीचा फोटो शेअर केला आहे. एअर इंडियाचे अधिकृत हस्तांतरण हा गेल्या काही दशकांतील देशातील पहिला मोठा यशस्वी खाजगीकरण करार असेल.

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी १९३२ मध्ये केली होती. त्यानंतर एअर इंडियाची धुरा सरकारच्या हाती गेली. आता पुन्हा एकदा ती टाटांकडे परतत आहे.

एकीकडे टाटा सन्सचे अध्यक्ष आणि पीएम मोदी यांच्यात बैठक झाली, तर त्यानंतर दुसऱ्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एअर इंडियाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात पोहोचले. एअर इंडियाचे अंतिम हस्तांतर म्हणजे कंपनीचे विद्यमान संचालक राजीनामा देतील.

हस्तांतरित होण्यापूर्वी, टाटा समूहाने विमान कंपनीच्या संदर्भात बदलांची संपूर्ण योजना आधीच तयार केली आहे. गुरुवारी मुंबईला जाणाऱ्या चार फ्लाइटमध्येही बदल दिसून आला. टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेससह एअर इंडिया आणि एआयएसएटीएसमधील ५० टक्के भागभांडवल विकत घेण्याची बोली जिंकली होती.

एअर इंडिया ही कंपनी आता अधिकृतरित्या टाटांची झाली आहे. निर्गुंतवणूक विभागाच्या सचिवांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. एअर इंडिया ताब्यात घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून हा करार आता बंद करण्यात आला आहे.

संपूर्ण शेअर टॅलेसकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. यानंतर चंद्रशेखन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एअर इंडिया टाटा समूहाकडे आल्याने या करारामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आता जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्यासाठी काम करणार आहोत, असं ते म्हणाले.

एअर इंडियाला रुळावर आणण्यासाठी टाटाने ऑनटाईम फरफॉर्मन्सवर जोर दिला आहे. म्हणजेच विमान सुटण्याआधी १० मिनिटे विमानाचे दरवाजे बंद होतील. तोवर जेवढे पॅसेंजर येतील तेवढ्यांना विमानाच्या क्षमतेनुसार घेण्यात येणार आहे.

असा प्रकार खासगी विमान कंपन्या करतात. यामुळे सीट रिकाम्या राहत नाहीत किंवा कमी रिकाम्या राहतात. कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून आपण सरकारीपासून खासगी क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. तसेच पुढील सात दिवस महत्वाचे असून कंपनीची इमेज, वागणूक या काळात बदलावी लागणार आहे.

विमानाच्या आत केल्या जाणाऱ्या घोषणेमध्ये प्रवाशांना पाहुणे म्हणून संबोधले जाईल. यासोबतच त्यांना टाटा समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचा रेकॉर्ड केलेला संदेशही ऐकविला जाऊ शकतो.

एअर इंडियाची चार बोईंग 747 जंबो विमानेही टाटाकडे हस्तांतरित केली जात आहेत. एअर इंडियाच्या अधिग्रहणानंतर, एअरएशिया इंडिया, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांसह एअरलाइन चालविण्यासाठी अंतरिम व्यवस्थापन तयार केले जाईल.