Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 10:35 IST2025-04-24T10:24:28+5:302025-04-24T10:35:17+5:30

Success Story: यू-ट्युबवर यंग, एनर्जिटिक यू-ट्युबर्सची चर्चा होते. अनेकांनी यू-ट्युबच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. परंतु, सत्तरीच्या एका आजीनं भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावलीत. शाळेची पायरीही न चढलेली ही आजी एकापेक्षा एक रेसिपी दाखवून स्टार यू-ट्युबर ठरली आहे

यू-ट्युबवर यंग, एनर्जिटिक यू-ट्युबर्सची चर्चा होते. अनेकांनी यू-ट्युबच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. परंतु, सत्तरीच्या एका आजीनं भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावलीत. शाळेची पायरीही न चढलेली ही आजी एकापेक्षा एक रेसिपी दाखवून स्टार यू-ट्युबर ठरली आहे. या आजींचं नाव आहे सुमन धामणे. अहिल्यानगरच्या सारोळा कासार गावातील आजीला सगळेच ‘आपली आजी’ म्हणून ओळखतात.

नवं काही सुरू करण्यासाठी वयाची अट नसते, हे ७४ वर्षीय सुमन धामणे या आजीनं सिद्ध केलंय. नातवाच्या मदतीने त्यांनी यू-ट्युबवर 'आपली आजी' नावाचं चॅनेल सुरू केलं. आज त्यांचे १७.९ लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्यांना महिन्याला ५ ते ६ लाख रुपये मिळतात. आजी आपल्या चॅनेलवर पारंपारिक महाराष्ट्रीयन पाककृती तयार करून दाखवत असतात. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे काहीही शक्य आहे, हे यातून दिसून येतं. सुमन धामणे यांच्या या यशाविषयी जाणून घेऊ.

मार्च २०२० मध्ये धामणे आजींनी आपलं यू-ट्युब चॅनेल सुरू केलं. ही त्यांच्या १७ वर्षांच्या नातवाची कल्पना होती. नातवानं त्यांना पावभाजी बनवायला सांगितली होती. आजींचा यू-ट्युब स्टार होण्याचा प्रवास सोपा नव्हता. कॅमेऱ्यासमोर यायला त्या घाबरत होत्या. तांत्रिक अडचणीही होत्या.

एकदा त्याचं चॅनल हॅकही झालं होतं. पण, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या नवीन आणि मनोरंजक व्हिडीओंनी लोकांना आपल्यासोबत जोडून ठेवलं. त्यांच्या पाककृती लोकांच्या मनाला भिडल्या. लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. अखेर यू-ट्युबनं त्यांना सिल्व्हर प्ले बटणही दिलं.

आज धामणे आजी दर आठवड्याला अनेक व्हिडीओ बनवतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाबद्दलही त्यांना बरंच काही शिकायला मिळालं आहे. सुमन धामणे यांचा डिजिटल विश्वात प्रवेश हा कुटुंबाच्या पाठिंब्याचा परिणाम आहे. त्यांना इंटरनेटचा कोणताही अनुभव नव्हता. त्यांचा नातू यश यांनं त्यांना यू-ट्युब चॅनेल सुरू करण्यास मदत केली. यशनं त्यांना तांत्रिक गोष्टी शिकवल्या. सुमन यांनी हा नवा प्रवास स्वीकारला. त्यांनी आपलं स्वयंपाक कौशल्य आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन पाककृती जगासोबत शेअर केल्या.

'आपली आजी' हा चॅनेल खूप झपाट्यानं प्रसिद्ध झाला. याचं कारण होतं सुमन धामणे यांची खरी स्टाईल आणि प्रत्येक व्हिडीओमध्ये दिसणारा त्यांचा प्रेमळ स्वभाव. त्यांची स्वयंपाक शैली पारंपारिक पाककृती आणि घरगुती मसाल्यांवर आधारित आहे. लोकांना ते खूप आवडलं. लोकांना खरा आणि पौष्टिक आहार हवा होता. पावभाजी, करडईची भाजी आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन मिठाई अशा अनेक पाककृती त्यांच्या चॅनेलवर आहेत. या पाककृती चव आणि नॉस्टॅल्जियाचं मिश्रण आहेत.

आज सुमन आजी या केवळ यू-ट्युब स्टार नाही. त्या एक प्रेरणास्त्रोत आहेत. यश मिळवण्यासाठी वय महत्त्वाचं नसतं, हे त्यांनी सिद्ध केलं. त्याच्या चॅनेलच्या यशामुळे त्यांना व्यवसायाच्या अनेक संधीही मिळाल्या आहेत. त्या पारंपारिक मसालेही विकतात. यामुळे त्या त्यांच्या चाहत्यांशी आणि खवय्यांशी अधिक जोडली गेली आहे. बदल आपण आत्मसात केले पाहिजेत, हे त्यांच्या प्रवासातून दिसून येतं. कुटुंबाचा आधार किती महत्त्वाचा आहे आणि डिजिटलच्या या जगात किती संधी आहेत, हे त्यांच्या यशावरून दिसून येतं. मनात जिद्द असेल तर तुम्ही यशाचं शिखर नक्कीच गाठू शकता.