'या' भारतीयानं कंपनी बुडण्यापासून वाचवली, आज Microsoft आहे जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:41 AM2024-01-02T08:41:51+5:302024-01-02T08:54:56+5:30

नडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने टेक इनोव्हेटर म्हणून स्वत:ला पुन्हा प्रस्थापित केलंय.

अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ (CEO) सत्या नडेला यांची सीएनएन बिझनेसद्वारे २०२३ साठी सीईओ ऑफ द ईयर म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये त्यांनी चेसचे सीईओ जेमी डिमन, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांना मागे टाकलं.

सत्या नडेला यांनी गेल्या वर्षी AI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने टेक इनोव्हेटर म्हणून स्वत:ला पुन्हा प्रस्थापित केलंय. यामुळेच गेल्या वर्षी कंपनीचे शेअर्स ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. नाडेला यांना आज परिचयाची गरज नाही. नाडेला यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकू.

सत्या नाडेला यांचा जन्म १९६७ साली हैदराबादमध्ये झाला. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई संस्कृत लेक्चरर होती. हैदराबाद पब्लिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी १९९६ मध्ये बूथ स्कूल ऑफ बिझनेस, शिकागो येथून एमबीए केलं.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सत्य नाडेला यांनी सन मायक्रोसिस्टम्समध्ये कंपनीच्या टेक टीममध्ये काम केलं. ते १९९२ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले आणि तेव्हापासून ते याच कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीशी दीर्घकाळ संबंध असताना त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलं. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर ग्रुपपासून कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर विभाग, ऑनलाइन सर्व्हिसेस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, अॅडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्ममध्ये काम केलं आणि नंतर ते प्रमुख म्हणून सर्व्हर विभागात परतले.

सत्या नाडेला यांना 'क्लाउड गुरू' असंही म्हणतात. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये क्लाउड कंप्युटिंगचं नेतृत्व केले आणि कंपनीला जगातील सर्वात मोठ्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर्सपैकी एक बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी ऑनलाइन सर्व्हिसेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मायक्रोसॉफ्ट बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. नंतर त्यांना कंपनीच्या 'सर्व्हिस अँड टूल्स' व्यवसायाचं अध्यक्ष बनवण्यात आल. मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस, विंडोज सर्व्हर आणि डेव्हलपर टूल्स मायक्रोसॉफ्ट अॅझूर क्लाउड प्लॅटफॉर्मवर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२०१४ मध्ये नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले. त्यांनी हे पद स्वीकारलं तेव्हा कंपनीसमोर अनेक समस्या होत्या. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला या समस्यांमधून केवळ बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेलं. त्यांनी क्लाउड कंप्युटिंग, मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित केलं आणि ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला नवसंजीवनी मिळाली. २०२१ मध्ये त्यांना कंपनीचे अध्यक्ष बनवण्यात आले.

सत्या नाडेला यांनी १९९२ मध्ये अनुपमा यांच्याशी विवाह केला. अनुपमा या सत्या नडेला यांच्या वडिलांच्या मित्राची कन्या. सत्या नडेला हे आपल्या कुटुंबासह वॉशिंग्टनमध्ये राहतात. सत्या नाडेला हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात खेळापासून प्रेरणा घेतात. ते फिटनेस फ्रीक देखील आहे आणि त्यांना धावण्याची आवड आहे. ते स्वत:ला शिकाऊ म्हणून संबोधत आणि वेळ मिळेल तेव्हा ऑनलाइन क्लासेस घेतात. मोकळ्या वेळेत त्यांना कविता वाचायला आवडतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नडेला यांना २०२३ च्या आर्थिक वर्षात ४.८५ कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,०३,६४,६३,४२५ रुपये पगार मिळाला होता. यामध्ये २,५००,००० डॉलर्स मूळ पगार आणि ६,४१४,७५० डॉलर्सच्या बोनसचा समावेश आहे. या कालावधीत त्यांना कोणताही स्टॉक ऑप्शन मिळाला नाही तर ३९,२३६,१३७ डॉलर्स किमतीचे स्टॉक समाविष्ट केले गेले. त्यांला दुसरं कंपेन्सेशन म्हणून ३६१,६५० डॉलर्स देखील मिळाले.