UPI पेमेंट फेल होतंय? 'या' ७ ट्रिक्स वापरा आणि एका झटक्यात प्रॉब्लेम सोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:32 IST2025-10-19T16:25:30+5:302025-10-19T16:32:31+5:30

महत्त्वाच्या वेळी UPI ट्रान्झॅक्शन फेल होणे, ही आता राष्ट्रीय समस्या बनली आहे. कॅश नाही आणि पेमेंट होत नाही, अशा वेळी काय कराल? ट्रान्झॅक्शन फेल का होते, यामागची कारणे सविस्तर जाणून घ्या.

UPI पेमेंट फेल होण्यामागे ९० टक्के वेळा तांत्रिक नाही, तर 'नेटवर्क कनेक्शन' हेच कारण असते. ज्यावेळी नेटवर्क कमी असते, तेव्हा ॲप बँक सर्व्हरपर्यंत तुमचा डेटा वेळेत पोहोचवू शकत नाही. यामुळे ट्रान्झॅक्शन 'टाइमआऊट' होऊन फेल होते. त्यामुळे, घाई न करता, पहिला उपाय म्हणून आपले इंटरनेट कनेक्शन चांगले असल्याची खात्री करून घ्या.

अनेकदा ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जुन्या व्हर्जनमुळे त्रुटी राहतात. हॅकर्स किंवा तांत्रिक बदलांमुळे ॲप कंपन्या नियमितपणे अपडेट्स जारी करतात. तुमचा UPI ॲप अपडेटेड नसेल, तर पेमेंट फेल होऊ शकते. त्यामुळे ॲप अपडेट करा.

कधीकधी तुमच्या बँकेचा सर्व्हर देखभाल किंवा खूप जास्त लोडमुळे तात्पुरता डाऊन असतो. अशा वेळी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पेमेंट होणार नाही. पेमेंट फेल झाल्यास, दुसऱ्या UPI ॲपवरून किंवा तुमच्याकडे जोडलेल्या दुसऱ्या बँक खात्यातून पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा वेळ वाचेल.

चुकीचा UPI पिन वारंवार टाकल्यास तुमचे बँक खाते तात्पुरते ब्लॉक केले जाऊ शकते. तसेच, प्रत्येक बँकेने एका दिवसात UPI द्वारे ट्रान्झॅक्शन करण्याची एक मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे पिन काळजीपूर्वक तपासा आणि एका दिवसात तुम्ही मर्यादा ओलांडली नाही ना, याची खात्री करा.

तुमचा फोन जुना असेल किंवा अनेक ॲप्स सुरू असतील, तर UPI ॲपला पुरेसा स्पीड मिळत नाही. ॲपला स्मूथ चालवण्यासाठी, फोनची कॅशे मेमरी वेळोवेळी डिलिट करा. तसेच, पेमेंट करताना अनावश्यक ॲप्स बंद करा.

खूप कमी वेळेत पेमेंट फेल झाल्यास, सिस्टीम त्याला संशयास्पद मानते आणि पुढील ट्रान्झॅक्शन्स ब्लॉक करते. पेमेंट फेल झाल्यास लगेच पुन्हा पुन्हा प्रयत्न करू नका. ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा शांतपणे प्रयत्न करा.

UPI ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे कापले गेले, पण ते समोरच्याला मिळाले नाहीत, तर चिंता करू नका. बहुतांश प्रकरणांमध्ये, कापली गेलेली रक्कम २४ ते ४८ तासांच्या आत तुमच्या खात्यात आपोआप जमा होते. जर रक्कम परत मिळाली नाही, तर ॲपच्या 'Help' सेक्शनमधून त्वरित तक्रार दाखल करा.

टॅग्स :बँकbank