ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:30 IST2025-10-27T16:22:48+5:302025-10-27T16:30:10+5:30
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९७.०५ रुपये तर नीचांक ४४.५० रुपये आहे.

शेअर बाजारातील १०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स (MIC Electronics) च्या स्मॉल कॅप शेअरमद्ये आज ७ टक्क्यांची तेजी दिसून आली. महत्वाचे म्हणजे, रेल्वेकडून एक नवीन ऑर्डर (Work Order) मिळाल्यानंतर ही वाढ दिसून आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) आणि उत्तर रेल्वेकडून (Northern Railway) मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतीत ही तेजी दिसून आली आहे.

आज हा स्मॉल कॅप स्टॉक बीएसईवर ५५.०२ रुपयांवर खुला झाला. यानंतर तो ५९.७४ रुपयांच्या दिवसातील उच्चांकावर (Intra-Day High) पोहोचला.

तत्पूर्वी, कंपनीने २७ ऑक्टोबरला शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ८२,५६,०६६ रुपयांचे काम मिळाले होते. सध्या कंपनीकडे एकूण १,१५,६५,१६० रुपयांच्या कामाच्या ऑर्डर आहेत.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सची शेअर बाजारातील अलीकडील कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक ३३.५२ टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या एका वर्षात यात ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, गेल्या ३ महिन्यांत हा शेअर सुमारे १० टक्क्यांनी वधारला आहे. ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९७.०५ रुपये तर नीचांक ४४.५० रुपये आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) १३७४ कोटी रुपये एवढे आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मात्र या शेअरने मालामाल केले आहे. या गुंतवणूकदारांनी ५ वर्षांपासून शेअर्स होल्ड केले, त्यांना तब्बल ६४५५ टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे.

याशिवाय, गेल्या ३ वर्षांचा विचार करता, या शेअरने ३८२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. दरम्यान कंपनीने एका शेअरवर 0.40 रुपयांचा शेवटचा लाभांश (डिव्हिडेंड) २००९ मध्ये दिला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















