ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST2025-08-12T16:46:42+5:302025-08-12T16:58:08+5:30

गेल्या ५ दिवसांत कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी, तर या वर्षात आतापर्यंत १५ टक्क्यांनी घसरला आहे...

मुकेश अंबानी यांच्या आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स सतत्याने चर्चेत आहेत. कंपनीचा शेअर सातत्याने घसरताना दिसत आहे. आज आलोक इंडस्ट्रीजचा शेअर साधारणपणे २ टक्क्यांनी घसरून १७.६३ रुपयांवर आला.

गेल्या ५ दिवसांत कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी, तर या वर्षात आतापर्यंत १५ टक्क्यांनी घसरला आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयानंतर ही घसरण दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर एकूण ५०% टॅरिफ जाहीर केल्यानंतर, आलोक इंडस्ट्रीजसह अनेक टेक्सटाइल कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरले आहेत. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे या उद्योगावर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या या नव्या टॅरिफ धोरणाचा, कापड, आयटी सेवा, अभियांत्रिकी वस्तू आणि ऑटो कंपोनंन्ट्स यासारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख तथा रणनीतिकार शेषाद्री सेन म्हणाले, "सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांत, कापड, रसायने आणि ऑटो सहाय्यक उद्योगांचा समावेश असेल. ज्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या निर्यातीत महत्त्वपूर्ण योगदान आहे."

जून तिमाहीचे निकाल जून २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीजचा निव्वळ तोटा १७१.५६ कोटी रुपये होता, जो जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत २०६.८७ कोटी रुपये एवढा होता.

जून २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत विक्री ७.३३% ने कमी होऊन ९३२.४९ कोटी रुपये झाली, जी जून २०२४ मध्ये संपलेल्या मागील तिमाहीत १००६.३० कोटी रुपये एवढी होती.

१९८६ मध्ये स्थापन झालेली आलोक इंडस्ट्रीज, ही एक एकात्मिक कापड उत्पादक कंपनी आहे. जिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही कंपनी कापूस आणि पॉलिस्टर या दोन्ही क्षेत्रात काम करते.

मुकेश अंबानी यांचीही गुंतवणूक - कापूस क्षेत्रात, कंपनी कताईपासून विणकाम, प्रक्रिया, तयार कापड, चादरी, टॉवेल आणि कपडे अशा सर्व क्षेत्रात काम करते. मार्च तिमाहीच्या अखेरीस, आरआयएलकडे कंपनीचा ४०% हिस्सा होता, तर जेएम फायनान्शियल एआरसीकडे कंपनीचा ३४.९९% हिस्सा होता.