YouTube चॅनेल सुरू करा अन् होईल भरघोस कमाई; कंपनीनं नियमांमध्ये केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:01 PM2023-06-14T18:01:33+5:302023-06-14T18:06:03+5:30

तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल आणि कमाईची चिंता करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या YouTube चॅनेलच्या कमाईची काळजी करण्याची गरज नाही.

कारण आता तुमच्या YouTube चॅनलचे ५०० सब्स्क्राईबर्स असले तरीही कमाई केली जाऊ शकते. यासाठी कंपनीने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापूर्वी, चॅनलमधून कमाईसाठी किमान १००० सब्स्क्राईबर्सची आवश्यकता होती.

YouTube ने म्हटलं आहे की, आम्ही YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी पात्रता निकषात कमी करत आहोत. आणि कमी सब्स्क्राईबर्स क्रिएटरसाठीही मोनेटायजेशन प्रक्रिया सुलभ करत आहे. कंपनी मोनेटायजेशन प्रोसेसची मर्यादा कमी करत आहे.

म्हणजेच, आता कमी फॉलोअर्स असलेले क्रिएटर देखील त्यांच्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून मोनेटायजेशन प्रक्रिया पूर्ण करून कमाई करू शकतील. यासाठी YouTube ने त्यांच्या नियमांत बदल केला आहे.

यापूर्वी, क्रिएटरला YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आणि त्यांच्या कंटेटमधून कमाई करण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागत होते. परंतु आता नवीन नियमानुसार, क्रिएटरला पात्र होण्यासाठी फक्त ५०० सब्स्क्राईबर्सची आवश्यकता आहे, जी आधीच्या पात्रतेच्या निम्मी आहे.

तसेच, YouTube ने व्हिडिओ पाहण्याचे तास ४००० ऐवजी आता ३००० वॉच आवर केले आहे. म्हणजेच आता वर्षभरात क्रिएटरला केवळ 3000 वॉच तास पूर्ण करायचे आहेत. Youtube Shorts व्ह्यूज १० मिलियनवरून ३ मिलियन पर्यंत कमी केले आहेत.

क्रिएटरला चॅनेल मोनेटायजेशन करण्यासाठी ९० दिवसांत ३० लाख Youtube Shorts व्ह्यूज असणे आवश्यक आहे. हे नियम पहिल्यांदा अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू केले जातील. यानंतर ते इतर देशांमध्येही लागू केले जाणार आहेत.

YouTube च्या नवीन मोनेटायजेशन प्रक्रियेचा छोट्या आणि नवख्या YouTubers ला खूप फायदा होणार आहे. त्यांना आता YouTube वर त्यांच्या कंटेटची कमाई करण्याच्या अधिक संधी असतील. पण त्यांचे प्रेक्षक वाढवण्यासाठी आणि जाहिरातींचा महसूल मिळविण्यासाठी त्यांना काही बेंचमार्क पूर्ण करणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये आधीच समाविष्ट केलेल्या क्रिएटरला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यात सहभागी झालेल्यांना सुपर थँक्स, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स यांसारख्या अनेक टूल्सचा वापर करता येईल. ते चॅनल सब्सक्रिप्शन टूलचा वापर करू शकतात आणि YouTube शॉपिंगमध्ये त्यांच्या उत्पादनांना प्रमोटही करू शकतील.

त्यामुळे तुम्हालाही ब्लॉगिंग, कुकिंग, टिचिंग करण्याची आवड असेल तर घरबसल्या यूट्यूब चॅनेल सुरू करून तुम्ही कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला कॅमेरा फेसिंग करण्याची भीती वाटत असेल तरी तुम्ही आवाजासह व्हिडिओ एडिट करून अपलोड करू शकता.