ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:40 IST2025-08-28T15:30:26+5:302025-08-28T15:40:33+5:30
Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोणताही चित्रपट आणि जाहिरातीशिवाय ३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कोरोनाच्या काळात गरजू लोकांना मदत करून अभिनेता सोनू सूदने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडे त्याचा कोणताही चित्रपट आला नाही. पण, तरीही त्याने ३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आता बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी उत्पन्नाचा एक नवा स्रोत म्हणून रिअल इस्टेट क्षेत्र उदयास आले आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन असोत किंवा उर्वशी रौतेला, अनेक सेलिब्रिटी रिअल इस्टेटमधून मोठी कमाई करत आहेत. आता या यादीत अभिनेता सोनू सूदचे नावही जोडले गेले आहे. सोनू सूदने नुकत्याच केलेल्या एका प्रॉपर्टीच्या व्यवहारातून तब्बल ३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रॉपर्टीच्या किमती खूप वेगाने वाढल्या आहेत, विशेषतः महालक्ष्मी परिसरात. याच भागातील 'लोखंडवाला मिनर्वा' या रिअल इस्टेट प्रकल्पात सोनू सूदचा एक फ्लॅट होता, जो त्याने ८.१० कोटी रुपयांना विकला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सोनू सूदने हा फ्लॅट सुमारे ५ कोटी रुपयांना विकत घेतला होता, म्हणजेच त्याला या एका व्यवहारातून ३.१० कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
मुंबईतील महालक्ष्मी परिसर नरिमन पॉइंट, वरळी आणि लोअर परळ यांसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांच्या जवळ आहे. या कारणामुळेच या भागात प्रॉपर्टीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोनू सूदचा हा फ्लॅट 'लोखंडवाला मिनर्वा' या प्रकल्पात आहे. या भागातील एक खास गोष्ट म्हणजे, इथे नोकरी करणारे आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या लोकांची संख्या जास्त आहे, ज्यामुळे इथे प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. सोनू सूदच्या या फ्लॅटचे कार्पेट एरिया १,२४७ चौरस फूट (११६ चौ.मी.) आहे, तर बिल्ट-अप एरिया १,४९७ चौरस फूट (१३९.०७ चौ.मी.) आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, या फ्लॅटच्या विक्रीची नोंदणी प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे. सोनू सूदने जो फ्लॅट विकला आहे, त्यासोबत दोन कार पार्किंगची जागाही आहे. या व्यवहारातून सरकारला सुमारे ४८.६० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्क मिळाले आहेत.