TV-Smartphone Price May Increase : टीव्ही-स्मार्टफोन्स महागण्याची शक्यता; चीनच्या टेक हबमधील लॉकडाऊन भारताला पडणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:38 AM2022-03-21T11:38:31+5:302022-03-21T11:49:56+5:30

TV-Smartphone Price May Increase : चीनमधून भारतात येणाऱ्या २०-५० टक्के इलेक्ट्रॉनिक कम्पोनन्ट्सच्या पुरवठ्यात शेनझेनचा मोठा वाटा आहे.

TV-Smartphone Price May Increase : चीनचे (China) टेक हब (tech Hub) मानल्या जाणाऱ्या शेनझेनमध्ये कोरोनाची लागण रुग्णांमध्ये (Coronavirus Patients) प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे टेलिव्हिजन, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेनझेन हे जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक आहे.

"भारतात चीनमधून येणाऱ्या २० ते ५० टक्के इलेक्ट्रॉनिक कम्पोनन्ट्सच्या सप्लायमध्ये शेनझेनचा मोठा वाटा आहे," अशी प्रतिक्रिया इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनचे (आयडीसी) संशोधन संचालक नवकिंदर सिंग यांनी दिली. लाईव्ह मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

"जर त्या ठिकाणी परिस्थिती अशीच कायम राहिली आणि निर्बंध उठवले गेले नाहीत, तर ब्रान्ड प्रोडक्ट्सच्या किंमतीत नक्कीच वाढ होईल. कंपन्या याचा बोजा उचलण्यास सक्षम नसतील आणि ग्राहकांना त्याची भरपाई करावी लागेल," असंही त्यांनी नमूद केलं.

शेनझेनमधील लॉकडाऊन तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहिल्यास त्याचा परिणाम जून तिमाहीच्या अखेरच्या दीड महिन्यांत तसेच सप्टेंबर तिमाहीतील स्मार्टफोन आणि पर्सनल कम्प्युटरच्या शिपमेंटवर होईल, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं.

काउंटरपॉइंट रिसर्चचे संशोधन संचालक तरुण पाठक यांनीही असंच मत व्यक्त केलं आणि ते म्हणाले की २० मार्चनंतर लॉकडाऊन सुरू राहिल्यास किमती वाढू लागतील. स्मार्टफोनच्या किमती ५ ते ७ टक्क्यांनी वाढू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या एका वर्षाच्या कालावधीत कम्पोनन्टच्या किंमती आणि मालभाडं वाढलं आहे. याचाच अर्थ बहुतांश ब्रान्ड वाढणाऱ्या किंमतीचा बोजा उचलू शकत नाहीत आणि त्याचा बोजा ग्राहकांवर टाकला जाईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

"लॉकडाऊनच्या कालावधीवर बरंच काही अवलंबून असेल. परंतु ग्राहकांना २०-३० चक्के दरवाढ सोसावी लागेल. जर आगामी तिमाहीत सप्लाय चेनशी निगडित समस्या दूर झाल्या तर जवळपास १०-१५ टक्के दरवाढीची अपेक्षा केली जाऊ शकते," असं ग्रेहाऊंड रिसर्चचे चीफ अॅनालिस्ट संचित वीर गोगिया यांनी सांगितलं.

"जर लॉकडाऊन वाढला तर या क्षेत्राच्या समस्या वाढतील. सप्लाय चेनदेखील बाधित होईल. उत्पादनाचं प्रमाणही कमी होईल. कच्च्या मालासाठी भारत चीनवर अवलंबून आहे हे याचं मुख्य कारण आहे. शेनझेनमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टीव्हीच्या किंमती ५ ते ७ टक्क्यांनी वाढू शकतील," असा अंदाज टीव्हीचं उत्पादन करणारी कंपनी वायडियोटेक्स इंटरनॅशनलचे संचालक अर्जुन बजाज यांनी व्यक्त केला.