SIP ने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, एका महिन्यात 26 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:30 IST2025-05-11T19:15:43+5:302025-05-11T20:30:59+5:30
सुमारे 8.38 कोटी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक केली आहे.

तुम्ही SIP म्हणजेच, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एप्रिल 2025 मध्ये SIP द्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीने एक नवा इतिहास रचला आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये 26,632 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुमारे 8.38 कोटी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक केली आहे.
एसआयपी गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचत असताना, इक्विटी फंडांमध्ये सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. एप्रिलमध्ये इक्विटी योजनांमध्ये येणारा निधी 24,269 कोटी रुपयांवर घसरला, जो गेल्या12२ महिन्यांतील सर्वात कमी आहे.
स्मॉल-कॅप योजनांमध्ये येणारा निधी 2.3 टक्क्यांनी घसरुन 3,999 कोटी रुपयांवर आला. याशिवाय, मिड-कॅप योजनांमध्ये 3.6 टक्क्यांनी घट झाली, तर लार्ज-कॅप फंडांमध्ये 2,671 कोटी रुपयांची वाढ झाली.
एप्रिलमध्ये गोल्ड ईटीएफमधून किरकोळ गुंतवणूक 5.82 कोटी रुपये झाली. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केला असे मानले जाते. त्याच वेळी, हायब्रिड फंडांमध्ये, विशेषतः आर्बिट्रेज योजनांमध्ये 11,000 कोटी रुपयांचा ओघ आला, म्हणजेच हा आता 'पार्किंग स्पेस' बनत आहेत. म्हणजेच, लोक तात्पुरते पैसे गुंतवतात आणि भविष्यासाठी नियोजन करतात.
एएमएफआयच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, आजचा भारतीय गुंतवणूकदार सोशल मीडिया किंवा अफवांच्या गोंधळात अडकत नाही. तो दीर्घकालीन दृष्टिकोनातून मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. (टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)