चांदीमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी की बुडण्याची भीती? जागतिक बँकेने दिला मोठा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:28 IST2026-01-30T14:50:28+5:302026-01-30T15:28:28+5:30
Silver Price Prediction : गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक उच्चांकावर असलेल्या चांदीच्या दरात आज प्रति ग्राम १० रुपयांची घट झाली आहे. सध्या एक ग्राम चांदी ४१५ रुपये तर एक किलो चांदी ४ लाख १५ हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. ही घसरण तात्पुरती असून मोठी दरवाढ येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

प्रसिद्ध जागतिक ब्रोकरेज फर्म 'सिटी'ने चांदीच्या किमतीबाबत आपला अंदाज कमालीचा वाढवला आहे. पुढील ३ महिन्यांत चांदी १५० डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचू शकते. भारतीय चलनात हे मूल्य सुमारे ५.५ लाख रुपये प्रति किलो इतके प्रचंड असेल.

सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे आता अनेक गुंतवणूकदार आपला नफा काढून चांदीमध्ये गुंतवत आहेत. सोन्याच्या तुलनेत चांदी अजूनही वाढीसाठी मोठी संधी देत असल्याने 'सेफ हेवन' म्हणून चांदीला पसंती मिळत आहे.

चांदी ही केवळ मौल्यवान धातू नसून तो एक औद्योगिक धातूही आहे. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. वाढत्या औद्योगिक मागणीमुळे किमतींना अधिक बळ मिळत आहे.

चांदीच्या बाजारपेठेत अनेक वर्षांपासून मागणी आणि पुरवठ्याचा असमतोल आहे. नवीन खाणींमधून होणारे उत्पादन मर्यादित आहे आणि बाजार सध्या केवळ जुन्या साठ्यावर अवलंबून आहे. पुरवठ्यातील ही कमतरता किमतींना वर खेचत आहे.

चांदीचे मोठे साठे असलेले गुंतवणूकदार सध्याच्या वाढत्या दरातही माल विकायला तयार नाहीत. त्यांना भविष्यात दर अजून वाढण्याची खात्री वाटत असल्याने बाजारात चांदीची उपलब्धता घटली आहे.

सोने आणि चांदीच्या किमतीतील गुणोत्तर ५० च्या खाली आले आहे. जेव्हा हा रेशो कमी होतो, तेव्हा चांदी सोन्यापेक्षा अधिक वेगाने महाग होते. चांदीचा सध्याचा वेग पाहता ती सोन्याला 'आऊटपरफॉर्म' करत असल्याचे दिसून येत आहे.

चांदीमधील ही तेजी केवळ औद्योगिक नसून काही प्रमाणात सट्टेबाजीवरही आधारित आहे. तसेच जगातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिले जात आहे. ही परिस्थिती किमान पुढील काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे.

















