Shark Tank India: 'जुगाडू कमलेश'च्या व्यवसायात गुंतवणूक न केल्याबद्दल नमिता थापरला पश्चाताप, आता म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 05:23 PM2022-02-12T17:23:44+5:302022-02-12T17:29:01+5:30

Shark Tank India चं क्रेझ आताही कायम आहे. आता या शो शी निगडीत काही माहिती समोर आली आहे.

एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या (Emcure Pharmaceuticals) एक्स्झिक्युटिव्ह डायरेक्टर नमिता थापर या शार्क टँक इंडिया (Shark Tank India) मध्ये शार्क म्हणजेच जज म्हणून सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान, त्यांनी काही व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली.

परंतु महाराष्ट्रातील मालेगावातून आलेल्या जुगाडू कमलेशच्या व्यवसायात मात्र त्यांनी गुंतवणूक केली नाही. परंतु आता त्यांना गोष्टीचा पश्चाताप होत आहे. आता त्यांनी यावर एक सुंदर गोष्ट सांगितलं आहे.

आपण या शोदरम्यान १७० बिझनेस आयडिया ऐकल्या. त्यापैकी २५ व्यवसायांमध्ये गुंतवणूकही केली. परंतु महाराष्ट्रातील जुगाडू कमलेश आणि पांडुरंग यांच्या अॅग्रो टुरिझन बिझनेसमध्ये गुंतवणूक न केल्यानं आता त्यांना पश्चाताप होत आहे. योरस्टोरीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील या दोन्ही शेतकऱ्यांना वास्तविक समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं त्यांच्या प्रोडक्ट्सची त्यांना योग्य विक्री करता आली नाही. अशा परिस्थितीत या फाऊंडर्सची मदत करणं आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी बिझनेस लीडर्सची आहे, असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील जुगाडू कमलेशनं किटकनाशकांच्या फवारणीसाठी अनोखं प्रोडक्ट तयार केलं आहे. याच्या मदतीनं किटकनाशकाच्या फवारणीदरम्यान शेतकऱ्यांना होणारी समस्या कमी होणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

जुगाडू कमलेशच्या व्यवसायात लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी ४० टक्के इक्विटीच्या मोबदल्यात १० लाख रूपये आणि २० लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं आहे.