बंपर परतावा! महिनाभरापासून रॉकेट बनलाय टाटाचा हा शेअर, रेखा झुनझुनवाला यांनी ₹1400 कोटी कमावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:42 PM2023-11-23T17:42:03+5:302023-11-23T17:53:10+5:30

राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गेल्या एका महिन्यापासून जबरदस्त नफा देत आहेत.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार तथा राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत, जे गेल्या एका महिन्यापासून जबरदस्त नफा देत आहेत. पण यातही, टाटा समूहाच्या टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअर्समधून रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 1400 कोटी रुपयांहूनही अधिकचा नफा झाला आहे.

300 रुपयांनी वाढला शेअरचा भाव - केवळ एका महिन्याच्या कालावधीचा विचार करता, टायटनच्या शेअरची किंमत प्रति शेअर जवळपास 300 रुपयांनी वाढली आहे. यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत तब्बल 1427 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ झाली आहे.

टायटनच्या शेअरची किंमत आज अर्थात गुरुवारी ₹3441.95 या उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या एका महिन्यात टायटनच्या शेअरची किंमत सुमारे 3100 रुपयांवरून या पातळीवर पोहोचली आहे. याचाच अर्थ एका महिन्यात स्टॉकमध्ये 300 रुपयांपेक्षाही आधिकचा परतावा दिला आहे.

जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीतील टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,76,95,970 शेअर आहेत. हे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 5.37 टक्के आहे.

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,75,95,970 शेअर होते. गेल्या एका महिन्यात हा शेअर 300 रुपयांहूनही अधिकने वाढला आहे. यामुळे, रेखा झुनझुनवाला यांच्या उत्पन्नात ₹1427 कोटी ( ₹300 x 47595970 शेअर) हूनही अधिक वाढ झाली आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल - टायटन कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹940 कोटींचा प्रॉफिट कमावला. जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹857 कोटींपेक्षा 9.7 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, ऑपरेशन्समधून त्याचा स्वतंत्र महसूल वार्षिक आधारावर ₹8,730 कोटींवरून 33.6 टक्क्यांनी वाढून ₹11,660 कोटी झाला आहे.

याच बरोबर, तिमाहीत एबिट वार्षिक आधारावर 16 टक्क्यांनी वाढून ₹1,392 कोटींवर पोहोचले आहे. तसेच, तिमाहीसाठी एबिट मार्जिन वार्षिक आधारावर 90 बेसिस पॉइंट्सने घसरून 12.8 टक्क्यांवर आले आहे. जे मागील वर्षीच्या तिमाहीत 13.7 टक्के होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)