स्टॉक्स, SIP, म्युच्युअल फंडांमध्ये पैसे बुडाले? गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय कोणते? कुठे मिळेल चांगला परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:40 IST2025-03-03T15:23:30+5:302025-03-03T15:40:43+5:30
Investment Ideas : शेअर बाजाराने निराशा केल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे पर्याय शोधत आहेत. यामध्ये काही सरकारी योजनाही आहेत.

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार गेल्या ४ महिन्यांपासून हैराण झाले आहेत. बाजारातील घसरणीत त्यांचा मागील दोनतीन वर्षांचा नफा कधीच गेला आहे. आता केलेली गुंतवणूकही कमी होत आहे. यातून एसआयपी आणि म्युच्युअल फंड योजनाही सुटल्या नाहीत. बहुतेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलीओ सध्या लाग रंगात दिसत आहेत. अशा परिस्थितीत देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदार आता सुरक्षित आणि शाश्वत गुंतवणुकीच्या पर्यायांच्या शोधात आहेत. तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्यायांबद्दल सांगणार आहोत.
सुरक्षित आणि निश्चित परतावा म्हटलं की डोळ्यांसमोर बँक एफडी आल्याशिवाय राहत नाही. सध्या देशातील सर्व बँका एफडीवर उत्तम व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना FD वर सामान्य नागरिकांपेक्षा ०.५० टक्के जास्त व्याज मिळते. या योजनेत तुम्हाला निश्चित परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना अगदी बँकांच्या एफडीसारखी आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकदा पैसे जमा करावे लागतील. या योजनेवर गुंतवणूकदारांना निश्चित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना बँक एफडीपेक्षा टीडीवर अधिक व्याज देत आहे.
PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. यावर सध्या ७.१ टक्के परतावा देत आहे. हा दर दरवर्षी जाहीर केला जातो. यामध्ये तुम्ही वार्षिक ५०० ते १.५ लाख रुपये गुंतवू शकता. ही योजना १५ वर्षांत परिपक्व होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ५ वर्षाचा कालावधी वाढवू शकता. यामध्ये कर सवलतीही मिळते.
सर्वाधिक व्याज देणाऱ्या सरकारी योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा पहिला क्रमांक आहे. यामध्ये फक्त १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीच खाते उघडले जाते. या योजनेंतर्गत मुलींना ८.२ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकरकमी रक्कम जमा केली जाते. यात तुम्ही वार्षिक २५० ते १.५ लाख रुपये जमा करू शकता.
भारतातील मालमत्ता हा नेहमीच गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुमच्या बजेटनुसार, तुम्ही देशातील कोणत्याही शहरात निवासी, व्यावसायिक किंवा कृषी मालमत्ता खरेदी करू शकता. लक्षात ठेवा ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यात तरलताही कमी आहे.
गेल्या काही वर्षात सोन्याला अक्षरशः सोन्याचे दिवस आले आहेत. सोन्यातील गुंतवणूक हा सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय समजला जातो. तुम्ही दागिने, नाणी, बार, बिस्किटे इत्यादी भौतिक सोन्यात पैसे गुंतवू शकता. याशिवाय तुम्ही गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता.