राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?

By जयदीप दाभोळकर | Updated: October 14, 2025 09:15 IST2025-10-14T09:02:23+5:302025-10-14T09:15:33+5:30

आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

स्वच्छ भारताच्या दिशेनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) एक नवीन आणि मोठं पाऊल उचललं आहे. आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. हे बक्षीस थेट त्यांच्या FASTag खात्यात रिचार्ज म्हणून जमा केले जाईल. ही मोहीम देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल.

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ ॲपचा वापर करावा लागेल. ॲपमध्ये वापरकर्त्याला जिओ-टॅग्ड, टाइम-स्टँप्ड फोटो अपलोड करावा लागेल. तसंच आपलं नाव, वाहन क्रमांक, मोबाईल नंबर आणि ठिकाण देखील नमूद करावे लागेल.

जर फोटो योग्य आढळला, तर त्या वाहन क्रमांकाला १,००० रुपयांचे बक्षीस FASTag रिचार्ज म्हणून मिळेल. परंतु, हे बक्षीस ट्रान्सफरेबल नसेल आणि ते रोख स्वरूपात घेता येणार नाही.

एनएचएआयने स्पष्ट केलं की, ही योजना फक्त एनएचएआयच्या नियंत्रणाखालील शौचालयांना लागू असेल. ढाबे, पेट्रोल पंप किंवा खासगी संस्थांचे शौचालयं यात समाविष्ट नसतील. तसंच, एका वाहन क्रमांकाला केवळ एकदाच बक्षीस मिळेल आणि एका शौचालयासाठी एका दिवसात अनेक तक्रारी आल्यास, केवळ पहिल्या वैध तक्रारीलाच बक्षिसासाठी विचारात घेतले जाईल.

स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासोबतच, लोकांमध्ये जबाबदारी आणि जागरूकता वाढवण्याचा हा उपक्रम आहे. जनतेच्या सहभागातूनच रस्त्याच्या कडेकडील सुविधा सुधारल्या जाऊ शकतात, असं एनएचएआयचं म्हणणं आहे.

अशी तक्रार करणाऱ्यांना बक्षीस देऊन सरकार स्वच्छतेला एक जनआंदोलन बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही मोहीम 'स्वच्छ भारत'च्या भावनेला पुन्हा गती देणारी सिद्ध होऊ शकते.