FASTag पासून बँकेपर्यंत, आजपासून बदलले हे महत्त्वाचे नियम; खिशावर थेट होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 10:17 IST2026-02-01T09:52:20+5:302026-02-01T10:17:14+5:30

New Rules From 1 February 2026: फेब्रुवारी महिना आजपासून सुरू होत आहे. आजपासून अनेक मोठे बदल देखील लागू झाले आहेत. १ फेब्रुवारीपासून, सिगारेट, तंबाखू, तंबाखू उत्पादनं, एलपीजी, पीएनजी, सीएनजी, फास्टॅग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल लागू होतील

New Rules From 1 February 2026: फेब्रुवारी महिना आजपासून सुरू होत आहे. आजपासून अनेक मोठे बदल देखील लागू झाले आहेत. १ फेब्रुवारीपासून, सिगारेट, तंबाखू, तंबाखू उत्पादनं, एलपीजी, पीएनजी, सीएनजी, फास्टॅग आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल लागू होतील. आज बँकिंग नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत.

यामध्ये एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांचा समावेश आहे. या बदलांचा ग्राहकांच्या दैनंदिन बँकिंग कामकाजावर परिणाम होईल, ज्यामध्ये आयएमपीएस व्यवहार, क्रेडिट कार्ड फायदे आणि केवायसी अपडेट यांचा समावेश आहे. आजपासून लागू होणाऱ्या नवीन बदलांचा शोध घेऊया.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) घोषणा केली आहे की, फास्टॅगसाठीची केवायसी (KYC) पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्रिय केल्यानंतर ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त केवायसी करण्याची गरज उरणार नाही. वाहनाशी संबंधित सर्व तपासणी करण्याची जबाबदारी आता फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांची असेल.

आजपासून सिगरेट, गुटखा, जर्दा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर टॅक्स वाढवण्यात आला आहे. फिल्टर आणि लांब सिगरेटवर जास्त ड्युटी आकारली जाईल. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात वाढ करण्यासोबतच पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर देखील लावला आहे. यामुळे या उत्पादनांच्या किरकोळ किमती वाढणार असून धूम्रपान करणाऱ्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे.

बजेटपूर्वीच एलपीजी ग्राहकांना झटका बसला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे काही नवीन नियम १५ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. हे बदल प्रामुख्याने IMPS व्यवहार शुल्काशी संबंधित आहेत. एसबीआयनं काही विशिष्ट आयएमपीएस व्यवहारांवरील सर्व्हिस चार्ज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

१ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीआयसीआय बँक आपल्या काही क्रेडिट कार्ड्सवर मिळणारी BookMyShow ची मोफत चित्रपट तिकीट सुविधा बंद करत आहे. मात्र, वाहतूक आणि विमा खर्चावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. काही कार्ड्ससाठी रिवॉर्ड सिस्टम अधिक सुधारण्यात येणार आहे.

एचडीएफसी बँकेने आपल्या प्रीमियम 'इन्फिनिया मेटल क्रेडिट कार्ड' (Infinia Metal Credit Card) साठी रिवॉर्ड पॉइंट रिडेम्पशनचे नियम बदलले आहेत. आजपासून ग्राहक एका महिन्यात जास्तीत जास्त ५ वेळाच रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करू शकतील. यापूर्वी यावर कोणतीही मर्यादा नव्हती.