...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 07:54 IST2021-05-17T07:51:24+5:302021-05-17T07:54:59+5:30
Income Tax: वर्षभरात तुमच्याकडून अजाणतेपणी वा अन्य कोणत्याही कारणांमुळे रोखीचे व्यवहार झाले तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे.

वर्षभरात तुमच्याकडून अजाणतेपणी वा अन्य कोणत्याही कारणांमुळे रोखीचे व्यवहार झाले तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा प्राप्तिकर खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा...

१० लाखांहून अधिक रकमेची एफडी
एका वर्षात गुंतवणूकदाराने १० लाख रुपये वा त्याहून अधिक रोख रकमेची एफडी केली तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते. या पैशांच्या स्रोताची माहिती देण्याची मागणी प्राप्तिकर विभाग नोटिशीद्वारे करू शकतो. त्यामुळे एफडी करतेवेळी शक्यतो चेकद्वारेच पैसे जमा करावेत

बँक खात्यात रोख रक्कम जमा करू नका
एखाद्याने कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक वा सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरली तर त्यासंदर्भातील माहिती संबंधित बँक वा सहकारी बँकेला प्राप्तिकर विभागाला द्यावी लागेल. एका आर्थिक वर्षात एखाद्याने एक वा अधिक बँक खात्यांत १० लाख रुपये वा त्याहून अधिक रक्कम रोखीत जमा केली तर प्राप्तिकर विभाग संबंधिताला नोटीस पाठवून पैशाच्या स्रोताची मागणी करू शकेल

क्रेडिट कार्डाचे बिल रोखीने भरू नका
तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल एक लाखांहून अधिक आले आणि तुम्ही बिल एकरकमी भरले तर प्राप्तिकर खाते तुम्हाला नोटीस पाठवू शकते तसेच आर्थिक वर्षात १० लाखांहून अधिक रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत केले तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते असे व्यवहार केले असल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात भरणे गरजेचे आहे

मालमत्ता खरेदी रोखीत केल्यास
मालमत्ता खरेदी करताना रोख रकमेचा वापर केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाऊ शकते. ३० लाख वा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता तुम्ही रोखीत खरेदी करत असाल वा विकत असाल तर प्रॉपर्टी रजिस्ट्राद्वारा त्यासंदर्भातील माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते. स्रोतांविषयी प्राप्तिकर खाते चौकशी करू शकते

शेअर्स, म्युच्युअल फंड्स गुंतवणूक
शेअर्स, म्युच्युअल फंड्स वा बाँड्स या सर्व व्यवहारांत तुम्ही रोख रकमेचा वापर करत असाल तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचाच रोख व्यवहार करता येऊ शकतो. त्याहून अधिक रकमेचे व्यवहार केल्यास प्राप्तिकर विभागाची तुमच्यावर नजर पडू शकते.

२ लाखांहून अधिक किमतीचे गिफ्ट
प्राप्तिकर कायद्याच्या २६९एसटी या सेक्शननुसार कोणतीही व्यक्ती २ लाख वा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेत असेल तर त्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. त्यामुळे तुम्ही २ लाख रुपये रोखीत न स्वीकारता अकाऊंट पेयी, चेक, बँक ड्राफ्ट किंवा ईसीएस यांच्या माध्यमातून स्वीकारावे.

















