पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 12:22 PM2024-01-02T12:22:52+5:302024-01-02T12:29:56+5:30

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजाराने वर्षाच्या पहिल्याच दिवशी विक्रमी पातळी गाठली. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत सरासरी मासिक जीएसटी संकलन १.६६ लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी देशात कार विक्रीने ४० लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. डिसेंबरमध्ये UPI पेमेंट ४२ टक्क्यांनी वाढले, नोव्हेंबरमध्ये NBFCs ची कर्जे २२ टक्क्यांनी वाढली आणि FPIs ने डिसेंबरमध्ये भारताच्या कर्ज बाजारात १८,००० कोटी रुपये जमा केले, ते गेल्या ७७ महिन्यांतील सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन १० टक्क्यांनी वाढून सुमारे १.६४ लाख कोटी रुपये झाले आहे. यासह, एप्रिल-डिसेंबर, २०२३ या कालावधीत १२ टक्के वाढीसह जीएसटी संकलन १४.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत ते १३.४० लाख कोटी रुपये होते. डिसेंबर हा या आर्थिक वर्षाचा सातवा महिना आहे, यामध्ये १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST संकलन झाले आहे.

डिसेंबरमध्ये, यूपीआय व्यवहारांचे मूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढून १८ लाख कोटी रुपये झाले, तर व्हॉल्यूम ५४ टक्क्यांनी वाढून १,२०२ कोटी रुपये झाले. गेल्या महिन्याच्या तुलनेत त्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. डिसेंबरमध्ये UPI अंतर्गत सरासरी दैनंदिन व्यवहार ४० कोटींवर पोहोचला आहे. NPCI ने तीन वर्षात १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

डिसेंबरमध्ये, फास्टॅग व्यवहारांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १३% वाढून ३४८ मिलियन झाले. या काळात व्यवहारांचे मूल्य १९ टक्क्यांनी वाढून ५,८६१ कोटी रुपयांवर पोहोचले. हे नोव्हेंबरच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावरून प्रवास केला, ज्यामुळे FASTag चे प्रमाण आणि मूल्य वाढले.

२०२३ मध्ये पहिल्यांदाच देशातील वाहन विक्रीचा आकडा ४० लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८.४ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ४१.१ लाख वाहने विकली होती, तर २०२२ मध्ये हा आकडा ३७.९ लाख युनिट होता. देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीने गेल्या वर्षी २० लाख वाहनांची विक्री केली. त्याचप्रमाणे ह्युंदाईच्या देशांतर्गत विक्रीनेही सहा लाख युनिटचा टप्पा ओलांडला आहे.

नोव्हेंबरमध्ये, NBFC कंपन्यांना बँक कर्ज २२ टक्क्यांनी वाढून सुमारे १५ लाख कोटी रुपये झाले. आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये बँकांचे गृहकर्ज २५.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत वैयक्तिक कर्जात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डची थकबाकीही अडीच लाख कोटींवर पोहोचली आहे.

वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडले पण दिवसाच्या अखेरीस परिस्थिती बदलली. बीएसईचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सुमारे ३२ अंकांच्या वाढीसह बंद झाला तर निफ्टी २१,७५० अंकांच्या जवळ पोहोचला. व्यवहारादरम्यान दोन्ही निर्देशांकांनी नवीन विक्रमांना स्पर्श केला. सेन्सेक्स ७२,५६२ अंकांवर तर निफ्टी २१,८३४ अंकांवर पोहोचला.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये भारताच्या कर्ज बाजारात १८,००० कोटींहून अधिक गुंतवणूक केली, जी जुलै २०१७ नंतरची सर्वाधिक आहे. नोव्हेंबरमध्ये १४,१०६ कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एफपीआयचा प्रवाह १८,३९३ कोटी रुपये होता. वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत तो आणखी वेगवान होईल, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.