RCB ची विक्री! अवाढव्य डील पाहून थक्क व्हाल; बातमी येताच दोन कंपन्यांच्या शेअर्सचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:06 IST2026-03-25T15:58:11+5:302026-03-25T16:06:24+5:30

...यानंतर आता, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या इतर संघांच्या मूल्यांकनातही वेगाने वाढ होऊ शकते, असे अंदाड तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) च्या विक्रीचे वृत्त येताच, बुधवारी भारतीय शेअर बाजारात आयपीएलशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. ट्रेडिंग दरम्यान, लिस्टेड आरपीएसजी व्हेंचर्स (RPSG Ventures) आणि सन टीव्ही नेटवर्क (Sun TV Network) यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली.

आरपीएसजी व्हेंचर्स ही आयपीएल संघ लखनौ सुपर जायंट्सची मालक आहे. तर सन टीव्ही सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालक आहे. आरपीएसजी ग्रुपने नोव्हेंबर २०२१ मध्ये ७०९० कोटी रुपयांमध्ये लखनौ फ्रँचायझीची खरेदी केली होती. ही फ्रँचायझी आरपीएसजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जाते.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (USL) मंगळवारी मोठी घोषणा केली. त्यांनी आपली आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांच्या समूहाला तब्बल ₹१६,६६० कोटी (१.७८ अब्ज डॉलर) किमतीच्या संपूर्ण रोख व्यवहारात विकली.

यानंतर आता, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या इतर संघांच्या मूल्यांकनातही वेगाने वाढ होऊ शकते, असे अंदाड तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दरमन, RPSG व्हेंचर्सचा शेअर १९% उसळीसह ७२६.२० रुपयांवर पोहोचला असून सन टीव्हीचा शेअर ५% ने वधारत ६४९.४० वर पोहोचला आहे.

या व्यवहारामध्ये आरसीबीच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांचा समावेश आहे. ब्रिटीश कंपनी डियाजिओची उपकंपनी असलेल्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आरसीबीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या नवीन करारानुसार, आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक आर्यमान विक्रम बिर्ला हे आरसीबीचे नवीन चेअरमन असतील, तर टाइम्स ऑफ इंडियाचे सत्यन गजवानी उपप्रमुख म्हणून काम पाहतील.

विराट कोहली प्रमुख चेहरा असलेल्या या संघाने गेल्या वर्षी १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. दरम्यान, या विक्री प्रस्तावाला आता बीसीसीआय (BCCI), आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल, महिला प्रीमियर लीग आणि भारतीय स्पर्धा आयोगाची औपचारिक मंजुरी मिळणे बाकी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)