विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:21 IST2025-10-20T09:08:36+5:302025-10-20T09:21:50+5:30

RBL Bank Acquisition: भारतीय बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी डील लवकरच होणार आहे. संयुक्त अरब अमीरातीमधील सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी या बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करणारे.

RBL Bank Acquisition: भारतीय बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी डील लवकरच होणार आहे. संयुक्त अरब अमीरातीमधील सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी (Emirates NBD) आरबीएल बँक (RBL Bank) मध्ये सुमारे ३ अब्ज डॉलर (जवळपास ₹२६,८५० कोटी) ची गुंतवणूक करून ६०% हिस्सेदारी खरेदी करेल. या बहुमताच्या हिस्सेदारीमुळे बँकेचं नियंत्रण एमिरेट्स एनबीडी आपल्या हाती घेईल.

मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, एमिरेट्स NBD या डीलअंतर्गत आरबीएल बँकेचे शेअर्स २८० रुपये प्रति शेअर दरानं खरेदी करेल. हा सौदा देशाच्या बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणुकीपैकी एक मानला जात आहे. तथापि, हा व्यवहार भारतीय रिझर्व्ह बँक, भागधारक आणि इतर नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असेल.

दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी या डीलला मंजुरी दिली आहे. गुंतवणूक प्रेफरेंशियल इश्यूच्या (preferential issue) माध्यमातून केली जाईल, ज्यानंतर एमिरेट्स एनबीडी भारतीय भागधारकांकडून २६% पर्यंतचा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनिवार्य ओपन ऑफर (Open Offer) देखील आणेल.

हा संपूर्ण करार भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि इतर नियामकांच्या मंजुरीनंतर पूर्ण होईल. आरबीएल बँकेनं आपल्या या करारावर भागधारकांची मंजुरी मिळवण्यासाठी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी एक एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM) बोलावण्याची घोषणा केली आहे. बँकेनं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की सर्व नियामक आणि भागधारक मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना १ एप्रिल २०२६ पासून प्रभावी होईल.

आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी यांच्यात झालेल्या या करारानुसार, भारतातील एमिरेट्स एनबीडीच्या सध्याच्या शाखांचे आरबीएल बँकेत विलीनीकरण केलं जाईल. हे पाऊल आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल आणि प्रेफरेंशियल इश्यू पूर्ण झाल्यानंतर अंमलात आणले जाईल. हा करार केवळ एमिरेट्स एनबीडीची भारतातील दीर्घकालीन धोरणं मजबूत करत नाही, तर भारत आणि यूएई यांच्यातील वाढत्या आर्थिक संबंधांनाही नवी दिशा देतो.

या करारामुळे आरबीएल बँकेच्या भांडवली आधारात (Capital Base) लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. बँकेचं म्हणणं आहे की या गुंतवणुकीमुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि त्यांच्या दीर्घकालीन वाढीच्या योजनांना मजबूत आधार मिळेल.

आरबीएल बँकेचे अध्यक्ष चंदन सिन्हा यांनी या भागीदारीला बँकेसाठी "परिवर्तनकारी पाऊल" म्हटलं आहे. ते म्हणाले की, एमिरेट्स एनबीडीची रणनीतिक गुंतवणूक केवळ जागतिक गुंतवणूकदारांचा भारताच्या बँकिंग क्षेत्रावरील विश्वास दर्शवते, तर आरबीएल बँकेला विकासाच्या नवीन शिखरावर पोहोचवण्याची क्षमताही ठेवते.