भारीच! जनरल डब्यातील प्रवाशांना २० रुपयांत जेवण, ६४ स्थानकांवर रेल्वेने सुरू केली यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 02:18 PM2023-07-20T14:18:05+5:302023-07-20T14:22:02+5:30

रेल्वे सामान्य डब्यातील प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभवासाठी स्वस्त दरात जेवण आणि पॅकेज केलेले पाणी पुरवत आहे.

भारतीय रेल्वे आता जनरल डब्यातील प्रवाशांनाही जेवण देणार आहे. यासोबतच प्रवाशांना बाटलीबंद पाणी आणि नाश्ताही दिला जाणार आहे. प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील.

सध्या 64 स्थानकांवर ही सुविधा सुरू असून, ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, सामान्य डब्यातील प्रवाशांना उत्तम केटरिंग सेवेसाठी प्लॅटफॉर्मवर फूड सर्व्हिंग काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना 20 आणि 50 रुपयांमध्ये जेवण घेता येणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, रेल्वेने सामान्य डब्यातील प्रवाशांसाठी खास डिझाईन केलेले स्वस्त दरात जेवण आणि पॅकेज केलेले पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांचा प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल.

हे फूड सर्व्हिंग काउंटर सामान्य डब्यांशी संबंधित प्लॅटफॉर्मवर लावले जातील. सहसा मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांसह प्रत्येक ट्रेनला किमान दोन सामान्य श्रेणीचे डबे असतात, एक लोकोमोटिव्हजवळ आणि एक ट्रेनच्या शेवटी. काउंटरवरून खरेदी केलेले सामान्य, अनारक्षित तिकीट असलेले कोणीही त्या डब्यांमधून प्रवास करू शकतात. या डब्यांवर अनेकदा गर्दी असते.

जनरल कोचमध्ये दिले जाणारे जेवण दोन श्रेणींमध्ये उपलब्ध असेल. एका वर्गवारीनुसार 20 रुपये किमतीत कोरड्या 'आलू' आणि लोणच्यासोबत सात पुऱ्या दिल्या जातील. तर, द्वितीय श्रेणीच्या जेवणाची किंमत 50 रुपये असेल आणि प्रवाशांना भात, राजमा, छोले, खिचडी, कुलचे, भटुरे, पाव-भाजी आणि मसाला डोसा असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ दिले जातील.

सामान्य डब्यांच्या जवळ प्लॅटफॉर्मवर लावण्यात येणाऱ्या काउंटरद्वारे स्वस्त जेवण आणि स्वस्त पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

IRCTC च्या किचन युनिटमधून जेवणाचा पुरवठा केला जाईल. या काउंटर्सची जागा रेल्वे झोनने ठरवायची आहे जेणेकरून हे काउंटर सामान्य डब्यांच्या जागेसह फलाटावर लावले जातील.

प्लॅटफॉर्मवर या सेवा काउंटरची तरतूद सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६४ स्थानकांवर काउंटर बसवण्यात आले आहेत.

या काउंटरवर 200 मिली पिण्याच्या पाण्याचे ग्लास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.